। रायगड । वार्ताहर ।
राजकारण करा जिंकायचे म्हटल्यावर ते करावेच लागणार; परंतु निदान मंदिराच्या कामांची खोटी बिले तरी काढू नका, आशा खोट्या कामांची बिले काढून जनतेची फसवणूक करणार्या उमेदवारांना आणि त्यांच्या बगलबच्च्यांना आता जनता माफ करणार नाही. मते विकत घेण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल त्यावेळी मतदारांनी जागरूक राहावे आणि पैशाची मस्ती उतरवण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी मतदारांना केले.
रामराज ग्रामपंचायतीच्या हद्दीतील महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांची बैठक रामराज येथे आयोजित केली होती. या बैठकीला जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, शेकापचे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष वागळे, नौशाद दापोलकर, मुकुंद दिवकर, गजानन दिवकर, प्रवीण धाटावकर, चंद्रकांत बामणे, नंदकुमार गावडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कृष्णा म्हात्रे, राजेंद्र बामणे, गिरीश शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. समाजात वैष्यम्यता निर्माण करण्याचे काम मिंध्ये सरकार करीत आहे. सर्वधर्म समभाव हे ब्रीद घेऊन महाविकास आघाडी सरकार आपल्यासमोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, त्या स्वराज्यामध्ये बारा बलुतेदार आनंदाने राहात होते. महिला सुरक्षित होत्या. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणार्या महायुतीच्या कालखंडात महिला सुरक्षित नाहीत, अल्पवयीन मुलींवरील अत्याचा वाढले आहेत, बेरोजगारांची संख्या वाढली आहे, तरुणाई व्यसनाधीनतेकडे झुकली आहे. अशा वेळी जनतेचा समग्र विचार करणार्या महाविकास आघाडी सरकारला जनतेने सत्तेत पाठवायला हवे, असे चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या.
विकासाच्यानावाने ठणठणाट
अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात विस्तारलेल्या विधानसभा मतदारसंघात विकासाच्या नावाने ठणठणाट आहे. आजही आदिवासी वाड्या मूलभूत गरजांसाठी आसुसलेल्या आहेत. महागाईच्या विळख्याने महिलांना ग्रासले आहे. लाडक्या बहिणीला योजनेतून पैसे दिले, पण त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांमध्ये वाढ केली आहे. यामुळे संसाराचा गाडा चालविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागणार्या लाडक्या बहिणीच सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी व्यक्त केला.