। अलिबाग । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी हा महाराष्ट्र घडला आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये अनेक महापुरुषांचे योगदान राहिले आहे. महाराष्ट्राची देशात व जगात एक वेगळी ओळख आहे. परंतु, आजची राजकीय परिस्थिती पाहून महापुरुषांना दुःख झाले असते. स्वतःच्या स्वार्थासाठी हे राज्यकर्ते सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. ही मोठी चिंताजनक बाब आहे. हे बदलण्यासाठी आपल्या सर्वांना एक होणे गरजेचे आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार महाराष्ट्रात टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी, वारंवार पक्ष बदलणार्या, चिखलात लोळणार्या आमदाराला या निवडणुकीत जनताच जागा दाखविणार, असे प्रतिपादन महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी केले. पोयनाड, पेझारी, आंबेपूर, चरी, कुरकुंडी, खिडकी, शहापूर या परिसरात चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांचा प्रचार दौरा सोमवारी (दि. 18) पार पडला. यावेळी शेकाप नेते जयंत पाटील, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती बाळूशेठ पाटील, विश्वास उद्धव बाळासाहेेब ठाकरे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार सतीश पाटील आदी महाविकास आघाडीतील शेकाप, शरद पवार गट, काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई म्हणाल्या की, रस्ते, पाणी, रोजगाराचे आश्वासन देऊन मते मिळविण्याचा प्रयत्न दळवींनी केला. मागील निवडणुकीत मोठ्या विश्वासाने दळवींना मतदारांनी निवडून दिले. परंतु, आपल्या पदाचा व सत्तेचा दुरुपयोग करून अनेकांना वेठीस धरण्याचे काम त्यांनी केले आहे. या मतदारसंघातील अनेक प्रश्न सोडविण्यास ते उदासीन ठरले आहेत. दळवींच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाही. गोरगरीबांना केंद्रबिंदू ठेवून मला काम करण्याची संधी राजकीय क्षेत्रात मिळाली. हीच परंपरा कायम ठेवून येथील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहीन, असे चिऊताई यांनी सांगितले.
चित्रलेखा पाटील यांचा विजय निश्चित : सतीश पाटील
महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी शैक्षणिक, आरोग्य अशा सर्वच क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. मुली शिकल्या पाहिजेत या भूमिकेतून त्यांनी शाळकरी मुलींसाठी हजारो सायकली वाटप केल्या. कोरोना काळातही त्यांनी जिवाची बाजी लावून कामे केली आहेत. क्रीडा क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. सुशिक्षित उमेदवार या मतदारसंघात लाभले आहे. महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते जोमाने प्रचाराचे काम करीत आहेत. एक वेगळा उत्साह यातून निर्माण होत आहे. चित्रलेखा पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या प्रचाराला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चित्रलेखा पाटील यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास उद्धव बाळासाहेेब ठाकरे शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार सतीश पाटील यांनी व्यक्त केला.