आयुष्यात चिकाटी महत्वाची- अतुल झेंडे


। अलिबाग । प्रतिनिधी ।

करिअर निवडताना तो आवडीचा निवडणे गरजेचे आहे कारण त्यावर पुढील आयुष्य अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यातील ध्येय निश्‍चित केले तर ते सोडता कामा नये. यासाठी आयुष्यात चिकाटी महत्वाची असते असे रायगड जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएन व अश्‍विनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श भवन येथे विद्यार्थी गुण गौरव सोहळा कार्यक्रमात केले.

यावेळी व्यापीठावर जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. गौतम पाटील, अलिबाग माजी उप नगराध्यक्ष सुरक्षा शाह, हरेश देशमुख, अश्‍विनी मेहता, रायगड असोसिएशन उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, खजिनदार विवेक पाटील, सेक्रेटरी विकास पाटील, सह सचिव अमोल नाईक, कार्याध्यक्ष सुदेश माळी, अमर मढवी, विजय पाटील, निलेश दुदम, सल्लागार सुरेश खडपे, मनोज पाटील, अभी काटकर, विराज घरत, गणेश जाधव, जितू शिगवण, रमेश कांबळे, हर्ष दर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालक यांना संबोधित करताना अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले की, मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रात पालकांची भूमिका महत्त्वाची असते. अनेक वेळा पालक आपल्याला हवे ते क्षेत्र निवडण्यास मुलांना भाग पाडतात. परंतु, मुलांची क्षमता, कुवत आणि इच्छा यांचा विचार पालकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुलं जे क्षेत्र निवडतील त्यात त्यांना समाधान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक आणि शैक्षणिक आयुष्यात समतोल येईल. याचप्रमाणे जीवनात बदल, सकारात्मक दृष्टिकोन, नवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, मेहनत, कष्ट,अपयशाशी सामोरे जाण्याची ताकत या गोष्टी मुलांमध्ये असल्या तरच त्यांचे अस्तित्व कायम राहील. आमच्या काळात असणारी शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धत ही वेगळी आहे. आज जे सत्कार स्वीकारत आहेत ते उद्या सत्कार देणारे असतात. ग्रामीण भागात मुलांमध्ये जी चिकाटी आहे ती कोणाकडे नाही.आपल्याकडे काही कमी नाही. शहरी भागातील विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यात फरक आहे. मी शिक्षण घेतले तेव्हा तीन किलो मीटर पायी जात होतो. विद्यार्थीयांचे दहावी नंतर करियर निवडले पाहिजे, असे ते यावेळी बोलत होते.

सध्याच्या स्पर्धात्मक युगात शैक्षणिक क्षेत्राबरोबरच व्यावसाय्कि क्षेत्रामध्ये दररोज नवनवीन कोर्सेस आणि रोजगाराच्या संधींची भर पडत आहे. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणाईला पावला पावलांवर वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या नवनवीन संधी खुणावू लागल्या आहेत. यामुळे नक्की काय करायचं? कुठे जायचं? या संभ्रभात अडकलेल्या तरुण पिढीकडून कळत नकळत बर्‍याचदा चांगल्या संधी हातातून निसटतात. पण अशा परिस्थितीत जर तरुणांनी योग्य करिअर मार्गदर्शन घेतले तर योग्यवेळी संधीचे सोने करणे त्यांच्यासाठी कठीण नाही. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास पाटील व आभार प्रदर्शन अमोल नाईक यांनी केले. तर, सूत्रसंचालन वेदांत कंटक यांनी केले

Exit mobile version