कुंडलिकेच्या वाढत्या प्रवाहात अडकली व्यक्ती

चार तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमने केली सुखरूप सुटका

। रोहा । प्रतिनिधी ।

रोहा धाटाव एमआयडीसी परिसरातील जैनवाडी येथील कुंडलिका नदीमध्ये एक व्यक्ती अंघोळीसाठी गेली होती. परंतु, नदीचा प्रवाह अचानक वाढल्याने ती व्यक्ती नदीपात्राच्या मध्यभागी अडकली. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ रेस्क्यू टीमने या व्यक्तीची सुखरूप सुटका केली.

संबंधित व्यक्ती सकाळच्या सुमारास कुंडलिका नदीत अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करत असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने तिला नदीपात्रातून बाहेर पडता आले नाही. त्यामुळे ती नदीच्या मध्यभागी अडकून पडली. घटनेची माहिती मिळताच सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. नदीचा वाढलेला प्रवाह आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे बचावकार्य आव्हानात्मक ठरले. अखेर चार तासांच्या प्रयत्नांनंतर रेस्क्यू टीमला संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे नदीबाहेर काढण्यात यश आले. सुखरूप सुटका झाल्याने मोठा अनर्थ टळला.

दरम्म्यान, पावसाळ्यात नदीच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Exit mobile version