। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील वारक येथील शेकापचे जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य नामदेव शिंदे यांच्या पत्नी उषा नामदेव शिंदे यांचे शुक्रवारी (दि.6) दुचाकीवरून अपघात झाल्याने निधन झाले. मृत्यूसमयी त्या 55 वर्षाच्या होत्या. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील असणार्या उषा शिंदे या रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्य सेविका पदावर कार्यरत होत्या.
आपले कर्तव्य बजावत असताना गोरगरिबांची विशेषतः शेकडो निराधार महिलांची निस्वार्थी सेवा केल्यामुळे माणगाव तालुक्यात त्यांच्याप्रती आदर आणि प्रेमभावना होती. आपल्या सेवेमधून स्वेच्छानिवृत्ती घेऊन त्यांनी ग्रामपंचायत विघवलीची थेट सरपंच निवडणूक शेकाप तर्फे लढवली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळताच माजी आमदार पंडीत पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील, माजी जि.प.सभापती चित्रा पाटील, अलिबागच्या नगरसेविका चित्रलेखा पाटील, ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, पंचायत समिती सदस्या रचना थोरे-पाटील, शेकाप युवा नेते निलेश थोरे यांनी शोक व्यक्त केला असून संपूर्ण शेकाप हा शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगितले.