अव्वाच्या सव्वा बिलांविरोधात कारवाई न झाल्यास शेकाप रस्त्यावर उतरणार

। पेण । वार्ताहर ।
महावितरण कंपनीच्या दुटप्पी धोरणामुळे सर्व सामान्यांना अव्वाच्या सव्वा बिल आकारून त्रास देण्याचे काम सुरू केले आहे. याविरोधात पेण शेकाप कार्यालयात सहचिटणीस संदेश ठाकूर यांनी सोमवारी (दि.25) विद्युत महावितरण कंपनीच्या भोंगल कारभारा विरूद्ध पत्रकार परिषद घेऊन विद्युत महावितरण कंपनीला 20 दिवसांचा अल्टीमेंट दिला आहे. मार्च 2020 ला ज्या वेळेला लॉकडाऊन जाहीर केला, त्यानंतर शासनाने बिल न भरण्याचे आवाहन केले. परंतु योग्य प्रकारे सुचना न दिल्याने सर्वसामान्य जनतेचा संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे बिल भरायचे की नाही भरायचे, असा समज जनतेच्या मनात निर्माण झाला. अशा स्थितीत महावितरण कंपनीच्या विज युनिट (रिडींग) वितरण करणार्‍या एजन्सिने सहा-सहा महिने रिडींगच घेतली नाही. त्याचा परिणाम वीज बिलावर होऊन मोठमोठ्या रक्कमांची वीज बिल सर्वसामान्य जनतेच्या माथी मारली. जवळपास दिड वर्षाचा कालावधी उलटून देखील या वीज बिलांवर योग्य ती कारवाई झाली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना वीज बिल भरणे कठीण झाले आहे.

शे.का.प सहचिटणीस संदेश ठाकूर यांनी सांगीतले की, आज आमच्या पक्ष कार्यालयात नामदेव धामणे, राहणार पाबळ हे बिलाची व्यथा घेऊन माझ्याकडे आले. त्यांना महिन्याचा बिल हा 81 हजार 990 रूपये आले असून युनिट 5 हजार 370 येवढे वापरले असल्याचे बिलावर दिसत होते. परंतु ग्रामीण भागात राहणारा सर्वसामान्य शेतकरी 5 हजार 370 युनिट जाळू शकतो का? हा संशोधनाचा विषय आहे. याचाच अर्थ विद्युत महावितरण कंपनी कोणतीच शाहनिशा न करता एजन्सिने दिलेल्या चुकीच्या माहितच्या आधारे चुकीची बिले पाठवली जातात. प्रथम या एजन्सीला काळ्या यादित टाकावे तसेच चुकीच्या पद्धतीने गेलेली बिले पुर्णतः सुधारून द्यावीत. जर 15 डिसेंबर पर्यंत चुकीची आकारलेली बिले दुरूस्त केली गेली नाही तर शेतकरी कामगार पक्ष आपल्या पद्धतीने महावितरण कंपनीच्या पेण कार्यालयाला टाळा मारल्या शिवाय राहणार नाही. शेतकरी कामगार पक्ष हा सर्व सामान्यांच्या व्यथा सोडवणारा पक्ष असल्याने सर्वसामान्यांची विज बिलाची व्यथा ही शेतकरी कामगार पक्षच सोडवेल, असे शेवटी सहचिटणीस संदेश ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. त्यावेळी त्यांच्या सोबत शेकापचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश ठाकूर, राकेश वर्तक, सचिन पाटील, महेंद्र पाटील आदि उपस्थित होते.

कारवाई केली जाणार
शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्ट मंडळाने नामदेव धामणे यांना घेऊन पेण विद्युत महाविरण कंपनीचे उपअधिक्षक अभियंता उमाकांत सकपाळे यांची भेट घेऊन 81 हजार 990 कसे आले, याची विचारणा करून नामदेव धामने यांचे बिल रितसर करून दिले. त्यावेळी उमाकांत सकपाळे यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या चुका करणार्‍या एजन्सीवर योग्य प्रकारे कारवाई केली जाईल.

Exit mobile version