भातशेतीला खोडकिड्याचा प्रादुर्भाव

शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण

। पाताळगंगा । वार्ताहर ।

भातपिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. खालापूर तालुक्यातील तळवली गावातील शेतकरी मधुकर मालकर, जे.के. मालकर, मोतीराम मालकर, देविदास मालकर आदी शेतकर्‍यांच्या भातशेतीवर खोडकिड्याचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत.

तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी शेती करतात. मात्र, दिवसेंदिवस भातशेती धोक्यात येत असल्यामुळे शेती करण्यास अनेक जण पाठ फिरवत आहेत. परतीचा पाऊस, ओळा दुष्काळ, सुका दुष्काळ शेतकर्‍यांच्या मुळावर उठत असल्यामुळे बळीराजा चांगलाच धास्तावला आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असताना खोडकिड्याचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.

खर्चाचा मेळ नाही
भातशेती करण्यासाठी मनुष्य बळासमवेत आर्थिक खर्चही मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. सद्यःस्थितीत मातीमध्ये टाकलेला पैसा वसूल होईल, ही आशा फोल ठरत चालली आहे. भातशेतीवर खोडकीडा निर्माण होत असल्यामुळे भातपिके वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपचार करीत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ बसणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.

Exit mobile version