रेल्वे स्थानकाच्या नामांतरासाठी निवेदन

| नेरळ | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या ऐतिहासिक निर्णयानंतर आता कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकांच्या नामांतराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश म्हात्रे यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. या दोन्ही रेल्वे स्थानकाच्या नामांतरासाठी संसदेत आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.

स्वातंत्र्यलढ्यात आणि ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्धच्या लढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या वीर हुतात्म्यांच्या स्मृती जपण्यासाठी हे नामांतर होणे गरजेचे असल्याचे मत चारही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्रांनी व्यक्त केले आहे. शिष्टमंडळाशी चर्चा करताना खासदार सुरेश म्हात्रे यांची भेट घेतली आणि त्यावेळी सागरी जिल्हे भूमिपुत्र संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील यांचे बलिदान आणि यांचा त्याग हे समाजासाठी प्रेरणादायी आहे. या दोन्ही हुतात्म्यांचा यथोचित गौरव होण्यासाठी रेल्वे स्थानकांना त्यांचे नाव देणे ही काळाची गरज आहे. नवी मुंबईच्या नामांतर लढ्याप्रमाणेच हा प्रश्नही आपण प्राधान्याने हाती घेऊ आणि प्रशासकीय पातळीवर यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिले आहे. भूमिपुत्रांमध्ये आनंदाचे वातावरण असून लवकरच या मागणीला मूर्त स्वरूप येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version