| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढणार आहेत. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली. पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर 8 एप्रिलपासून लागू होणार आहेत. सध्या कच्च्या तेलाच्या आंतराष्ट्रीय किंमतीत अस्थिरता कायम आहे. अशात केंद्र सरकारने उचलेले हे पाऊल पाहाता सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार होणार आहे. खासकरुन जे रोज वाहनांनी प्रवास करतात. किंवा वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसणार आहे.
सामान्यांना फटका?
दुसरीकडे ,सरकारचा हा तर्क आहे की या दरवाढीने सरकारच्या तिजोरीत पैसे जमा झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य विकास योजनांत पैसा ओतता येणार आहे. नुकतेच बजेटमध्ये केंद्र सरकारने मोठमोठे प्रकल्प जाहीर केले आहेत. त्यांना या दरवाढीतून पैसा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास त्याचा महागाईवरचा प्रभाव मर्यादित असतो, परंतु जर किंमती वाढल्या तर त्याचा महागाईवरही थेट परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या,या निर्णयाने आता सर्वसामान्य लोकांना इंधन खर्चासाठी काही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
एक्साईज डयूटी म्हणजे काय ?
पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा उत्पादन शुल्क ( एक्साईज डयूटी ) हा केंद्र सरकारकडून आकारला जाणारा कर आहे, या करामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असतात. सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 19.90 रुपये आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क सुमारे 15.80 रुपये प्रति लिटर आहे. साल 2014 मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क 9.48 रुपये प्रति लिटर होते आणि डिझेलवर ते 3.56 रुपये प्रति लिटर होते, ते नंतर अनेक वेळा वाढवण्यात आले. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली. या आदेशात म्हटले आहे की पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये वाढवण्यात आले आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये किती दर?
दिल्ली,मुंबई,कोलकाता अशा महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर जाणून घेऊया. दिल्लीत पेट्रोलची किंमत 94.72 रुपये आणि डिझेलची किंमत 87.62 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलचा दर 103.44 रुपये आणि डिझेलचा दर 89.97 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 104.95 रुपये आणि डिझेलची किंमत 91.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 100.76 रुपये आणि डिझेलची किंमत 92.35 रुपये प्रति लिटर आहे.