| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यात घुम गावातील सातवी मध्ये शिकणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर या मुलाचा योग्य उपचारा अभावी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.06) रोजी घडली आहे. गर्वांग यांच्या मृत्युने घूम गावासह संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली असून, या मृत्युला माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार असल्याचे आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्वांग यांच्या पायावर केस पूळी आल्याने त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. यानंतर शनिवारी त्याला अचानक ताप भरल्याने रात्री 10.30 च्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी सलाईन लावून त्याला स्टेबल केले व पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी याला तर केस पुळी झाले, यावेळी ताप येतोच, एवढ्या छोट्या गोष्टी साठी 108 ची रुग्णवाहिका कशाला आणायची, म्हसळयाचा डॉक्टरांना काही समजत नाही का ? असे बोलून विनाउपचार करता त्यांना घरी पाठवले. त्यानंतर घरी आल्यावर गर्वांगचा अचानक मृत्यू झाला. पोलिसांना दिलेल्या जबाबात गर्वांच्या वडिलांनी ही माहिती दिली आहे. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवले असते तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थानी व्यक्त केली. गर्वांग उपचार न करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याच्या कुटुंबांने केली आहे.
उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्ण दाखल झाल्यानंतर त्याला तपासले असता अॅडमिट करण्याची आवश्यकता वाटली नाही, असे त्याला तपासणार्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणतीही रक्त तपासणी न करता तापाच्या गोळ्या देऊन रुग्णाला घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल. त्यानंतर वरिष्ठ याबाबत योग्य ती कारवाई करतील.
डॉ. किरण शिंदे,
सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड
डॉक्टर सावंत व डॉक्टर राप्ते हे त्या वेळेस ड्युटीवर होते. सदरील रुग्ण तपासल्यानंतर तो व्यवस्थित असल्याने त्याला घरी पाठवले. वरिष्ठांकडून यासंदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून, मुलाला व त्याच्या आई-वडिलांना 100 टक्के न्याय मिळेल.
डॉ. महेश मेहता, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक
माणगाव उपजिल्हा रुग्णालय
सदरील प्रकार आरोग्य विभागाचे धिंडवडे काढणारा असून, केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व कर्तव्यशून्य कारभारामुळे 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार असणार्या संबंधित डॉक्टरांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी.
विपुल उभारे,
युवासेना जिल्हाप्रमुख, रायगड