| अलिबाग । प्रतिनिधी ।
वाढते इंधनचे दर, ध्वनी, धुर प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने विजेवर चालणार्या दुचाकीला मान्यता नव्याने बाजारात आलेल्या या दुचाकींना ग्राहकांनी पसंती दर्शविली. 2020 पासून आजपर्यंत विजेवर चालणार्या दीड हजार तर पेट्रोलवर चालणार्या दुचाकीची 20 हजार पेक्षा अधिक विक्री झाली झाल्याचे आकडेवारीनुसार समोर आले आहे. नव्याने होऊ घातलेल्या विजेवर चालणार्या दुचाकीची विक्री वाढत असली, तरीही आजही पेट्रोलवर चालणार्या दुचाकींची मागणी वाढत असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत. इंधनाच्या वाढत्या दरामुळे पेट्रोलवर चालणारी दुचाकी नको रे बाबा अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यात धुर, व आवाजामुळे वायु व ध्वनी प्रदुषणाचा धोका सतत भेडसावत आहे. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी सरकारने पर्याय म्हणून विजेवर चालणार्या दुचाकीला मान्यता दिली. गेल्या चार वर्षापासून विजेवर चालणार्या दुचाकी बाजारात आल्या. तीन ते चार तासात विजेवर चालणार्या दुचाकीला चार्जींग केल्यावर 70 ते 80 किलो मीटरचा प्रवास अवघ्या 30 रुपयात होत आहे.मात्र पेट्रोलवर चालणार्या दुचाकीचा तोच प्रवास 120 रुपयांत करावा लागतो. तसेच विजेवर चालणार्या दुचाकीला आवाज नसल्याने वाहन चालवितानादेखील ध्वनी प्रदुषणाचा धोका नाही. त्यामुळे पेट्रोलवर चालणार्या दुचाकीपेक्षा विजेवर चालणार्या दुचाकीला ग्राहकांनी पसंती दर्शविली. बाजारात विजेवर चालणार्या मोठ मोठी दुकाने उपलब्ध झाली आहेत. 2020 पासून आजपर्यंत जिल्ह्यात दीड हजार पेक्षा अधिक ग्राहकांनी विजेवर चालणार्या दुचाकीची खरेदी केली.
ही खरेदी दिवसेंदिवस वाढत असली, तरीही बाजारात आजही पेट्रोलवर चालणार्या दुचाकीला मागणी वाढत आहे. 2020 पासून होंन्डा कंपनीच्या 20 हजार पेक्षा दुचाकी विकण्यात आल्या आहेत. त्यात अलिबागमधून सुमारे साडेचार हजार दुचाकी खरेदी केल्या आहेत. तसेच हिरो कंपनीच्या सुमारे एक हजार पेक्षा दुचाकी खरेदी करण्यात आल्या आहेत. या आकडेवारीनुसार विजेवर चालणार्या दुचाकीपेक्षा पेट्रोलवर चालणार्या दुचाकीला मागणी वाढत आहे.
पेट्रोलवर चालणार्या दुचाकीची खरेदी कमी होऊ लागली होती. परंतू त्याचा फारसा परिणाम व्यवसायावर झाला नाही. ग्राहकांकडून आजही पेट्रोलवर चालणार्या दुचाकीला मागणी वाढत आहे. – नवीन झा, व्यवस्थापक होन्डा शोरुम
विजेवर चालणार्या दुचाकीला मागणी वाढत आहे. कमी खर्चात अधिक प्रवास करण्याची व्यवस्था विजेवर चालणार्या दुचाकीमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अडीच वर्षात विजेवर चालणार्या दुचाकीची मागणीचा कल वाढत आहे. – रोहन पडीकर, सेल प्रमुख