। पेझारी । वार्ताहर
अलिबाग तालुक्यातील पेझारी-पिरखिंड-ताडवागळे रस्त्याच्या कामाला शेकापने मंजुरी मिळविली होती. त्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ होत असल्याबद्दल माजी आ. पंडित पाटील यांनी समाधान व्यक्त केले आहे.
या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ विविध मान्यवरांचे उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी उपस्थितांसमोर पंडित पाटील बोलत होते.यावेळी जि.प.माजी सदस्या चित्रा आस्वाद पाटील, अलिबागचे माजी सभापती प्रमोद ठाकूर, माजी उपसभापती प्रकाश पाटील, युवानेते सवाई पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, वाघोडे सरपंच कृष्णा जाधव, ताडवागळे उपसरपंच शैलेश पाटील, उद्योजक सुरेश म्हात्रे, विनोद पाटील, अॅड. आशिष पाटील, जगदीश पाटील, बाबू ठाकूर, के.डी. म्हात्रे, आंबेपूर माजी सरपंच कमलाकर म्हात्रे, जी.एच. पाटील, भूषण चवरकर, परिसरातील पंचायतीचे सदस्य, सदस्या, कार्यकर्ते, वाघोडे ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी निलेश गावंड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पंडित पाटील म्हणाले की, पोयनाड-ताडवागळे-पिरखिंड रस्ता हा फडणवीस सरकार असताना मी आमदार म्हणून मंजूर केला त्यासाठी त्यावेळी मी अडीच कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु त्यावेळी कोरोनाचा आजार आल्यामुळे हा रस्ता राहिला होता. परंतु अलिबाग-मुरुड, पोयनाड-नागोठणे, कार्लेखिंड-चोंढी रस्ता, कार्लेखिंड-रेवस रस्ता या अनेक रस्त्यांच्या कामाच्या संकल्पना माझ्या असून त्याचा पाठपुरावा विधान परिषद आ. जयंत पाटील व मी स्वतः केलेला आहे.असेही त्यांनी सांगितले.
पोयनाड-नागोठणे हा रस्ता खारपाटील यांचे कन्स्ट्रक्शनने अत्यंत विक्रमी वेळेते पूर्ण केलेला आहे. अलिबाग-मुरुडच्या रस्त्यासाठी आपण पाठपुरावा केला आहे. आज मी पाठपुरावा केलेली अलिबाग तालुक्यातील अनेक कामे ही सुस्थितीत आहेत.
यावेळी बोलताना पंडित पाटील पुढे म्हणाले की, शेतकरी कामगार पक्ष दुसर्याच्या कामाचे श्रेय कधीच घेत नाही, पेझारी-पिरखिंड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला असून कामाची सुरुवात देखील आजच सुप्रभात कन्स्ट्रक्शनने सुरु केली असून हा पेझारी-पिरखिंड रस्ता ताडवागळे-दळवी-खरोशी पर्यंत असून हा रस्ता पुढे याच खिंडीतून खानाव-उसर पर्यंत दुसर्या टप्प्यात जाणार असून दुसर्या टप्प्याच्या कामासाठी विधान परिषदेचे आ. भाई जयंत पाटील यांनी निधी मंजूर केला असून त्याचे टेंडर लवकरच मंजूर होईल असे सांगून पेझारी-पिरखिंड रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन मी येथील कार्यकर्त्यांना दिले होते ते आज पूर्णत्वास नेले आहे. हा रस्ता पूर्ण होईपर्यंत या विभागातील सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
आगामी येणार्या ग्रामपंचायत प्रत्येक निवडणुकीतून जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे एकमेकांतील मतभेद बाजूला सारुन शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी पुढे विजय हा आपलाच आहे ही जिद्द मनाशी बाळगून कामाला लागा असेही सांगितले. यावेळी चित्रा पाटील, सवाई पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.