मुरुडमधील फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी खुले

वन्यजीवप्रेमी, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण
मुरुड | वार्ताहर |
मुरुडमधील फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी कोरोना काळातील अटी-शर्तींचे पालन करुन खुले करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. अभयारण्यामध्ये प्रवेश करणार्‍या पर्यटक व वन्यजीव प्रेमींद्वारे मास्क परिधान करणे, तसेच योग्य शारीरिक अंतर राखणे या अटींवर अभयारण्य सुरु करण्याची मान्यता दिली आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रायगड जिल्यात पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या कार्यक्षेत्र करीता चौथ्या स्थराचे निर्बंध लागू करण्यात आले त्या नुसार मुरुड मधील फणसाड अभयारण्य पर्यटकांसाठी व वन्यजीव प्रेमींसाठी बंद ठेवण्यात आले होते , सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून कोविड 19 च्या अनुषंगाने अनलॉक करण्याची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने सुरु करण्यात आली आहे त्या अनुषंगाने उपवनसंरक्षक ( वन्यजीव ) ठाणे यांनी वन्यजीव प्रेमी व पर्यटक यांची अभयारण्य सुरु करण्याबाबत होत असलेली प्रचंड मागणी या पार्श्‍वभूमीवर अभयारण्य क्षेत्र व पायवाटा पर्यटकांसाठी सर्व सुविधांसह कोविड 19 च्या अनुषंगाने आवश्यक अटी व शर्तींना आधीन राहून खुले करण्यास परवानगी मिळणेसाठी पत्रान्वये विनंती केली होती.

त्यानुसार पर्यटक व वन्यजीव प्रेमींची अभयारण्य सुरु करण्याच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अभयारण्यामध्ये प्रवेश करणार्‍या पर्यटक व वन्यजीव प्रेमींद्वारे मास्क परिधान करणे , तसेच योग्य शारीरिक अंतर राखणे या अटींवर अभयारण्य सुरु करण्याची मान्यता दिली आहे. फणसाड अभयारण्य सुरु केल्याने अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले , व सर्व कर्मचारी वृंदांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले तसेच पर्यटक व व वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Exit mobile version