फणसाडला फक्त पाऊसच भेटतो

निसर्ग पर्यटनाचा आनंदच काही और

| मुरुड | वार्ताहर |

फणसाड…निर्बिड अभयारण्य…हिरव्या वनश्रीने बहरलेल्या या परिसरात पावसाळी पर्यटनाचा आनंद काही औरच असतो. या पर्यटनात पावसाळी पर्यटनात प्रत्यक्ष पाऊस भेटतो. हा आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटक हमखास फणसाड अभयारण्यात येतात. भर पावसात ओलेचिंब होऊन थंडगार वातावरणात सभोवार पसरलेल्या दाट धुक्यातून वाट काढत चिखलाने निसरड्या झालेल्या वाटेवरुन चालत प्रत्यक्षात निसर्गालाच भेटून कवेत घ्यायचा असेल तर एखाद्या विकेंडला मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्याला भेट द्यायलाच हवी अशी धारणा येथे भेट दिल्यानंतर लक्षात येते.

एकेकाळी जंजिऱ्याच्या तत्कालिन सिध्दी नबाबाचे केसोली जंगल म्हणजेच आताचे फणसाड अभयारण्य हे शिकार क्षेत्र असल्याने ते राखीव वनक्षेत्र होते व येथील जनतेला त्यात शिकारीसाठी बंदी होती.या अभयारण्यात सातशे ते आठशे विविध प्रकारचे दुर्मिळ व औषधी असे सातशे ते आठशे वृक्ष असून त्यात साग, निलगिरी, ऐन, किंजळ, हेद ,कुडा, कांचन, सावर,अर्जुन, जांभूळ अशा मोठ्या वृक्षांचा समावेश आहे.शिवाय सर्पगंधा,कुडा,कुरडू, उक्षी,घाणेरी आदी औषधी वृक्षांबरोबरच वाघेटी, वाकेरी, पळसवेल, पेंटगुळ आदी वेलींसह औषधी गारंबीची वेल ही महत्त्वाची वेल ही या अभयारण्याचे वैशिष्ट्‌‍य आहे. अभयारण्यात सुमारे 166 जातींचे पक्षी आढळून येतात.

येथील भोमाचा माळ,गुण्याचा माळ, भांडव्याचा ,माळ चाकाचा माळ असे हिरव्यागार गवताची चादर सभोवार पसरलेले माळ तर फणसाड गाण,सावरट गाण,चिखल गाण अशा जेथे सतत नैसर्गिक बारमाही पाण्याचे स्रोत आहेत अशा गाणीतील थंडगार पाणी पिण्यासाठी फणसाडमधील पशू,पक्षी हमखास येतात त्यांना न्याहाळण्यासाठी वनखात्याने येथे मनोरे उभारले आहेत.या सर्वांचा आनंद लुटायचा असेल तर या नजिकच्या वन्यजीव अभयारण्याला एकदातरी भेट देऊन प्रत्यक्ष अनुभव घेणे आवश्यक आहे.

ऐन पावसाळ्यातही या वन्यजीव संरक्षक अभयारण्यातील विविध प्राणी,पक्षी, फुलपाखरे, पशू, सरपटणारे प्राणी, अनेक जातींचे कीटक तसेच विविध प्रकारच्या वृक्षवल्लींचे जवळून दर्शन घेताना व त्यांच्या सहवासात केलेले ते वन भोजन ! सगळी औरच मज्जा

थंडगार जलधारा शिरशिरी आणतात
वन्यजीव संरक्षक अभयारण्याच्या एका बाजूला अथांग पसरलेला अरबी समुद्र तर दुसरीकडे हिरव्या गर्द वनराईने नटलेला डोंगराळ प्रदेश मनाला भुरळ पाडतो. या अभयारण्याला खरं तर निसर्गाचा जणू वरदहस्तच लाभलेला आहे.पावसाळ्यात येथील गर्द हिरवाईने नटलेल्या डोंगरमाथ्यावरील घनदाट झाडी झुडुपांसंगे माथ्यावरील आकाशात ओथंबलेल्या काळ्यानिळ्या ढगांतून कोसळणाऱ्या थंडगार जलधारांच्या अंगाला शिरशिरी भरविणाऱ्या अखंड वर्षावात ओलेचिंब होऊन पावसाला प्रत्यक्ष भेटण्याचा मनमुराद आनंद येथे मिळतो.

Exit mobile version