फणसडोंगरी ग्रामस्थ उत्तर भारतीय कुटुंबाच्या वादाने त्रस्त

| पेण | प्रतिनिधी |

पेण फणसडोंगरी गोळीबार मैदान येथे विश्‍वकर्मा कुटुंबिय आणि प्रसाद कुटुंबिय यांचा गेली दोन ते तीन वर्ष कौटुंबिक वादाने फणसडोंगरीवासिये त्रस्त झाले आहेत. हे दोन्ही कुटुंबिय उत्तर भारतीय असून जागेच्या वादातून सतत भांडण होत असून, शांतता व सुव्यवस्थेचे या दोन्ही कुटुंबियांनी तीनतेरा वाजवले आहेत. दर महिना ते पंधरा दिवसात या कुटुंबियांचा वाद पोलीसठाण्यापर्यंत जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, विश्‍वकर्मा कुटुंबियांच्या घरात मुली आहेत तर प्रसाद यांच्या कुटुंबात मुले आहेत. त्यामुळे परस्परांच्यावर चुकीच्या पध्दतीने गुन्हे नोंदवून पोलीस यंत्रणेला त्रस्त केले जात आहे. सदर दोन्ही कुटुंबियांना पोलीसांकडून वेळोवेळी योग्य ती कारवाई होऊन सुध्दा दोन्ही कुटुंब परस्परांविरूध्द कुरघोडी करण्यास कमी पडत नाहीत. अखेर फणसडोंगरी ग्रामस्थ जिल्हा पोलिस अधिक्षकांना भेटून या दोन्ही कुटुंबियांवर तडीपारची कारवाई करावी अशी मागणी करणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या जमिनीवरून वाद सुरू आहे ती जमिन पेण नगरपालिका हद्दितील सरकारी जमीन आहे. ती कुणाच्याही मालकीची जमीन नाही. असे असतानादेखील चुकीच्या पध्दतीने कागदपत्र करून या जमिनी परस्परांच्या नावावर केल्याचे समजते.

दोन दिवसांपूर्वी फिर्यादी रेखा गोविंद प्रसाद हिने नर्मदा कुंजबिहारी विश्‍वकर्मा, दुर्गा विश्‍वकर्मा, साक्षी विश्‍वकर्मा, कुंजबिहारी विश्‍वकर्मा, गोविंद विश्‍वकर्मा, वंदना विश्‍वकर्मा यांच्या विरूध्द फिर्याद नोंदविली असून, तिच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद केला आहे. समाज माध्यमांवर फिरणार्‍या व्हिडीओमध्ये विश्‍वकर्मा कुटुंबियांकडून प्रसाद कुटुंबियांवर हल्ला चढविल्याचा दिसून येत आहे. असे असले तरी दुर्गा कुंजबिहारी विश्‍वकर्मा हिने गोविंद प्रसाद, रेखा प्रसाद, हेवंती प्रसाद, चंदन प्रसाद यांच्याविरूध्द देखील पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रजपूत हे अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version