पनवेल पत्रकार मंचाने केला फार्मासिस्टचा सत्कार

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त केले सन्मानित
। पनवेल । वार्ताहर ।
25 सप्टेंबर हा जगभरात जागतिक फार्मासिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णांना योग्य औषधे देणे, त्यांचे समुपदेशन करणे या कामी हिरीरीने अग्रस्थानी असणारा समाजातील हा घटक महत्वाचा असला तरी बर्‍याचदा दुर्लक्षित राहिला आहे. फार्मासिस्ट मंडळींचे रुग्णसेवेचे कार्याचे प्रती आभार प्रकट करण्याचे उद्देशाने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या वतीने पनवेलमधील फार्मासिस्ट बांधवांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
पनवेल मधील यशवंत मेडिकल, माधव मेडिकल, धन्वंतरी मेडिकल आणि प्रिती मेडिकल यांना गौरविण्यात आले. पत्रकार मंचाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र देऊन फार्मासिस्ट बांधवांचा सत्कार केला. यावेळी अध्यक्ष माधव पाटील यांनी सांगितले की, आजारातून बरे झाल्यावर डॉक्टरांचे आभार मानले जातात परंतु या प्रक्रियेत महत्वाचे असलेल्या फार्मसिस्ट बांधवांचे आभार मानले जात नाहीत. खरे तर प्रत्येक फार्मासिस्टचा सत्कार करायचा आमचा मानस आहे. वेळेअभावी हे शक्य झाले नाही.
या सोहळ्याला मंदार दोंदे, विवेक पाटील, संजय कदम, खजिनदार नितीन कोळी, राजू गाडे, सचिन वायदंडे, सुनील राठोड, चेतन पोपेटा, वैभव लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version