मुंबई | प्रतिनिधी |
हॅलो, मी शरद पवार बोलतोय, असा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत एका व्यक्तीने मंत्रालयात फोन केल्याने सगळेच चक्रावून गेले. प्रशासकीय अधिकार्यांच्या बदल्यांबाबत बोलून संबंधित व्यक्तीने फोन ठेवून दिला. मात्र, त्यानंतर खरंच हा फोन शरद पवार यांनी केला होता का, याची पडताळणी करण्यात आली आणि त्यातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. तीन ते चार दिवसांपूर्वी हा फोन आला होता. बदल्यांबाबत बोलताना काही जमीन व्यवहारासंबंधी फाइलवर शेरा मारण्यास सदर व्यक्तीने सांगितल्याचेही सांगण्यात येत आहे.
पैशांची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाजात बोलून व्यवहारात पैशांंची मागणी केल्याचं समोर आलंय. याप्रकरणी प्रताप खंडेभराड यांच्या फिर्यादीवरुन पुण्याच्या चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी धीरज पठारे गुरव नामक व्यक्तीशी शरद पवारांच्या आवाजात बोलला आहे. तर किरण काकडे याने पवारांचा पीए असल्याचं भासवले. व्याजाने घेतलेल्या पैशातून हा प्रकार घडलाय.