माथेरानमधील गटारांमध्ये पडलेले पेव्हर ब्लॉक उचला

माजी नगराध्यक्षा सावंत यांचे पालिकेला पत्र

| नेरळ | प्रतिनिधी |

माथेरान शहरात धूळ विरहित रस्ते बनविले जात आहेत. दस्तुरी ते माथेरान बाजारपेठ आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागात क्ले पेव्हर ब्लॉक पासून रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी या रस्त्यावर पूर्वी लावण्यात आलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक काढण्यात आले आहेत. ते सर्व सिमेंट पेव्हर बाजारपेठ भागात गटारांमध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे ते सर्व सिमेंट पेव्हर ब्लॉक गटारांमधून काढून अन्य ठिकाणी ढीग मारून ठेवावेत अशी मागणी करणारे पत्र माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेला दिले आहे.

ज्यांच्या काळात माथेरान मध्ये धूळ विरहित रस्त्यांची कामे सुरु झाली त्या माथेरान पालिकेच्या माजी नगराध्यक्ष प्रेरणा सावंत यांनी रस्त्याच्या बाजूला गटारामध्ये पडलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक बद्दल लेखी पत्र व्यवहार पालिकेकडे केला आहे. माथेरान मधील मुख्य रस्ता असलेल्या दस्तुरी नाका ते माथेरान शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर लावण्यात आलेले सिमेंट पेव्हर ब्लॉक काढण्यात आले आहेत. त्या ठिकाणी क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या महात्मा गांधी मुख्य रस्त्यालगतच्या गटारामध्ये रस्त्यावरील जुने पेव्हर ब्लॉक काढून ते ब्लॉक गटारामध्ये डंप करून ठेवले आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाळी पाण्याचा गटारातून निचरा होत नाही. तर त्याचा परिणाम मुख्य रस्त्यावरून होऊन रस्त्यालगतच्या दुकानात किंवा घरामध्ये पाणी घुसून नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

त्यामुळे सदरचे ब्लॉक नागरी वस्तीतील बहुतेक ठिकाणचे खराब झालेल्या ब्लॉकच्या ठिकाणी त्यांची वाहतूक करून तात्काळ लावून घ्यावे, अशी सूचना आपल्याला वारंवार केलेल्या आहेत. त्यात तेथे ठेवलेले अनेक ब्लॉक हे चोरीला देखील गेले आहेत त्यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. वारंवार सदर बाबतीत आपल्याकडे तसेच अभियंता, बांधकाम विभागाकडे सदर बाबतीत योग्य नियोजन करावे यासाठी देखील सूचना केल्या होत्या परंतु आजमितीपर्यंत याबाबतीत आपल्याकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. तरी येणार्‍या काही दिवसात सदरील ब्लॉक गटारातून उचलून नागरिकांना आणि पर्यटकांना होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रेरणा प्रसाद सावंत यांनी केली आहे.

Exit mobile version