| माथेरान | वार्ताहर |
धूळविरहित रस्त्याला पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी सनियंत्रण समितीने माथेरान या प्रदूषणमुऊी स्थळाच्या रस्त्यांसाठी क्ले पेव्हर ब्लॉक लावण्याची परवानगी दिल्यामुळे अनेक ठिकाणी ब्लॉकचे रस्ते बनविण्यात आले आहेत. परंर्तुें नुकताच एमएमआरडीएच्या माध्यमातून ठेकेदारांमार्फत लावण्यात आलेले ब्लॉक हे निकृष्ट असल्याचे चित्र याच पावसाळ्यात दिसून आले आहे. अत्यंत घाईगडबडीत रस्त्यांची कामे आटोपण्यासाठी ठेकेदाराने लगबग केल्यामुळे ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने झालेली नसल्याने पावसाळी पाणी अनेक ठिकाणी गटारात निचरा होण्याऐवजी रस्त्यावरून वाहात आहे.
त्याचप्रमाणे लावण्यात आलेले ब्लॉक हे कंपनीत परिपक्व होण्याअगोदरच कच्च्या स्वरूपाचे आणून लावण्यात आले आहेत, त्यामुळेच जागोजागी ब्लॉक नष्ट होऊन त्या त्या ठिकाणी खड्ड्यांचे रस्ते बनलेले दिसत आहेत. मुख्य रस्त्यावर सातत्याने रहदारी सुरू असते. हातरिक्षा, घोड्यांची तसेच पर्यटकांची वर्दळ असते. अशावेळी एखाद्या घोड्याला ठोकर लागल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्य घोडेवाल्याला आर्थिक झळ सोसावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पेव्हर ब्लॉक मातीचे असून, यामुळे उष्णता जाणवत नाही, परंतु ते कच्च्या स्वरूपाचे असल्याने रस्त्याला खड्डे पडत आहेत. करोडो रुपयांची ही कामे असताना संबंधित ठेकेदार अशी तकलादू कामे का करीत आहे. यामागे काय गौडबंगाल दडलेले आहे, या सर्व महत्त्वपूर्ण कामांवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे की नाही, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.