| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील निसर्ग हा पावसाळ्यात सर्वांना आकर्षित करीत असतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात पर्यटक मोठ्या प्रमाणात वर्षासहलीसाठी येत असतात. मात्र, सतत होणारे अपघात यामुळे पर्यटकांना पाणवठ्यांवर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. धबधबे आणि धरणाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे, तरीदेखील पर्यटकांची तोबा गर्दी आढळून आली आहे. दरम्यान, प्रशासनाने लावलेले कलम 144 नावापुरते आहे काय, असा प्रश्न गर्दीनंतर होत आहे. कर्जत तालुक्यातील अवसरे धरण, साळोख धरण, खांडस धरण, पाषाणे धरण, डोंगरपाडा धरण, पाली भूतिवली धरण, बेकरे कोल्हा धबधबा, कोमलवाडी धबधबा, बेडीसगाव धबधबा, टपालवाडी धबधबा, आनंदवाडी धबधबा, नेरळ-जुम्मापट्टी धबधबा, मोहिली धबधबा, वदप धबधबा, आषाणे-कोषाणे धबधबा, पळसदरी धरण व धबधबा, कोंढाणे लेणी-धरण-धबधबा, सोलनपाडा धरण-पाझर तलाव आदी ठिकाणी पर्यटनासाठी पावसाळयात पर्यटनासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. प्रशासनाने आपली जबाबदारी बाजूला करण्यासाठी 28 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत धबधबे आणि धरण परिसरात येण्यास बंदी घातली आहे.
मात्र, आता ही जमावबंदी कर्जत तालुक्यासाठी शाप ठरत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे तालुक्यातील पर्यटन लयाला जाण्याची भीती आहे. निसर्गाने भरभरून दिलेल्या कर्जत तालुक्याला वरदान लाभले आहे आणि त्याचा आस्वाद घेण्यास बंद आहे अशी स्थिती कर्जत तालुक्यातील निसर्ग पर्यटनाची झाली आहे. मात्र कलम 144 लावून देखील पर्यटक यांच्या येण्याने कर्जत तालुक्यातील रस्त्यांवर आज दिवसभर वाहतूक कोंडी होती. त्यामुळे प्रशासनाची बंदी ही व्यावासायिकांसाठी आर्थिक नुकसान करणारी ठरत आहे. कर्जत, नेरळ पोलीस ठाणे यांनी पोलीस कर्मचार्यांना पाणवठ्यांचे ठिकाणी बंदोबस्तासाठी पाठवून दिले आहे. तरीदेखील आलेल्या पर्यटकांची संख्या बघितली की पावसाळी पर्यटन जोरात असल्याचे स्पष्ट होते आणि त्यामुळे बंदी कुठे आहे, असा प्रश्न मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी उपस्थित केला आहे.