सुदैवाने जिवीतहानी टळली
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग -वडखळ मार्गावरील पळी येथे सोमवारी सायंकाळी पिकअप पलटी होऊन मोठा अपघात झाला. या मार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे टायर फुटल्याने ही घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली. रस्त्यावरील खड्ड्याची दुरुस्ती बांधकाम विभागाने वेळेवर न केल्याने हा अपघात घडल्याची संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय शर्मा हा चालक कांद्याने भरलेला पिकअप घेऊन पेणकडून अलिबागकडे सोमवारी ( दि.30 ) सायंकाळी जात होता. अलिबाग पासून काही अंतरावर असलेल्या नागावशास्त्रीनगर येथे गाडी घेऊन निघाला. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास पळी येथे आल्यावर समोर असलेल्या खड्ड्यात गाडीचा टायर आदळला.त्यामुळे टायर फुटून गाडी पलटी झाली. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्यासह त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली.
पलटी झालेल्या पिकअप मधील चालकासह अन्य व्यक्तींना स्थानिकांच्या मदतीने गाडीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. खड्ड्यांची दुरुस्ती करण्याबाबत अनेक वेळा वेगवेगळ्या संस्था संघटनांनी बांधकाम विभागाकडे निवेदन दिले आहे. मात्र, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात आली नाही. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. याला बांधकाम विभाग जबाबदार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.