| पुणे | प्रतिनिधी |
लोणावळ्यात भरधाव स्कॉर्पियो कारने दोन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील हॉटेल मिस्टी मेडोजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका भरधाव स्कॉर्पियो गाडीने रस्त्याच्या कडेला कट्ट्यावर बसलेल्या दोघांना जोरात धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी आहे. कार चालक हा दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. तुलसी राम रामपाल यादव असे स्कार्पिओ चालकाचे नाव आहे. तर आयात शेख जखमी असून, कार्तिक चिंचणकर याचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमीला जवळच्या रूग्णालयात पाठवले. दरम्यान या अपघाता नंतर अज्ञात्यांनी स्कॉर्पियो गाडीला आग लावून पेटवून दिली. लोणावळा शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.







