। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव तालुक्यातून एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली असून, जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना घराचा स्लॅब अचानक कोसळून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यातील घरोशी वाडी येथे सोमवारी (दि. 16) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरोशीवाडी येथे एका जुन्या घराच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामासाठी कामगार घरावर दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक घराचा स्लॅब कोसळला. स्लॅब कोसळल्याने त्याखाली काम करीत असलेले दोन कामगार अडकले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत दीपक बाजीराव जाधव आणि सचिन बाळाराम कोळी या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर दोन्ही कामगारांचे मृतदेह माणगाव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत.






