मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पिकअपची ट्रेलरला धडक; एकाचा मृत्यू

। रसायनी । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर रसायनीतील पानशिल गावाच्या हद्दीत सोमवारी (दि.2) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. महामार्गाच्या कडेला मेंटेनन्सच्या कामासाठी उभ्या असलेल्या ट्रेलरला पिकअप जीपने मागील बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअप जीपमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आयआरबी कंपनीच्या जीपमधून खालापूर टोलनाका ते कळंबोली या दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पेट्रोलिंग ड्युटी करीत होते. यावेळी आयआरबी कंट्रोल रूम, कुसगाव जि. पुणे येथून अपघाताची माहिती मिळाल्यानंतर तक्रारदार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरील घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी मेंटेनन्स पट्ट्यावर रस्त्याच्या कडेला ट्रेलर उभा असल्याचे निदर्शनास आले. संबंधित ट्रेलर चालकाने वाहन उभे करताना महामार्गावरून जाणाऱ्या इतर वाहनांना सावध करण्यासाठी पार्किंग लाईट, रिफ्लेक्टर किंवा रिफ्लेक्टिव्ह त्रिकोण यांसारखी कोणतीही धोक्याची सूचना योग्य अंतरावर लावली नव्हती. तसेच इतर वाहनांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत निष्काळजीपणे ट्रेलर उभा केल्यामुळे पिकअप जीपची ट्रेलरला मागून धडक बसून हा अपघात झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात खारघर, कोपरागाव (नवी मुंबई) येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, याच परिसरातील अन्य दोघे जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.

Exit mobile version