मनसेचे सिडकोच्या आरोग्य विभागाला पत्र
| चिरनेर | प्रतिनिधी |
सिडकोच्या स्मार्ट सिटीच्या द्रोणागिरीच्या कोस्टल रोडवर कचऱ्याचे जागोजागी ढीग लागले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांनी सिडकोच्या आरोग्य विभागाला पत्रव्यवहार केला आहे. द्रोणागिरी नोडमधील सेक्टर 48 व 42 च्या कोस्टल रोडला लागून अनधिकृत कचरा डम्पिंग झोन सुरू असल्याचा ठपका ठेवत, मनसेने 4 जून रोजी सिडको आरोग्य अधिकाऱ्यांना कान उघडणी करणारे पत्र दिले.
या निवेदनात द्रोणागिरी नोड हा सिडकोचा आदर्श वसाहत प्रकल्प असला तरी कोस्टल रोडच्या बाजूला कचऱ्याचे अनधिकृत स्मारक उभे राहिले आहे. बाहेरून येणारी वाहने शासकीय नियमांना हरताल फासून रात्रीच्या अंधारात कचरा टाकून जातात. मात्र स्थानिक नागरिकांना या कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. डेंग्यू व मलेरियाच्या डासांनी तर इथे कायमस्वरूपी वास्तव्य केली असल्याची निवेदनातून मनसेने बोचरी टीका केली आहे. कचऱ्यावर जनावरे रस्त्यावर येत असल्याने येथे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्वच्छ भारत अभियान फक्त कागदावर राबवायचे का? आता दंडात्मक कारवाई अभियान राबवा, असा सल्लादेखील मनसेने दिला आहे.







