। अलिबाग । प्रतिनिधी ।
उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे रायगड जिल्हा युवा प्रमुख पिंट्या उर्फ अमिर ठाकूर यांना 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे. याबाबत त्यांना पत्र देण्यात आले आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंट्या ठाकूर हे माजी आ. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र असून, एक व्यावसायिक आहेत. सामाजिक व राजकीय क्षेत्रातदेखील ते सक्रीय आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे रायगड युवा जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. पिंट्या ठाकूर यांना एक पत्र आले आहे. त्यांच्याकडून 25 लाख रुपयांची खंडणी त्या पत्राद्वारे मागण्यात आली आहे. अन्यथा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांनी अलिबाग पोलीस ठाणे गाठून आलेल्या पत्रानुसार अज्ञाताविरोेधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनेनंतर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. धमकी देणार्यांपर्यंत अलिबाग पोलीस पोहोचण्यास यशस्वी ठरतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.