पिरवाडी समुद्रकिनारी ऑईल

। उरण । वार्ताहर ।
नागाव-पिरवाडी समुद्र किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात ऑईल आल्याने स्थानिक मच्छिमाराचे नुकसान होऊन उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबत नागाव पिरवाडी मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष भूपेश कडू यांनी आवाज उठविला आहे. शासनाच्या विविध विभागात शासकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधून निवेदन देऊन सदर समस्या त्वरित सोडविण्याची मागणी केली. उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्र किनार्‍यावर गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात ऑइल सर्वत्र पसरल्यामुळे येथील स्थानिक मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागाव-पिरवाडी येथे ऑइल नॅचरल गॅस कंपनी हा राष्ट्रीय प्रकल्प कार्यरत असल्याने ऑइल सातत्याने समुद्रात येत असते. त्यामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. कंपनीकडून स्थानिक मच्छिमारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. नागाव पिरवाडी येथील समुद्र किनार्‍यावर आलेल्या ऑइल तेलची पाहणी करून स्थानिक मच्छिमारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागाव पिरवाडी मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष भूपेश कडू व स्थानिक मच्छिमार, ग्रामस्थांनी तहसलीदार, पंचायत समिती उरण, नागाव ग्रामपंचायत, आ.महेश बालदी, सहाय्यक आयुक्त अलिबाग, परवाना अधिकारी उरण यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

Exit mobile version