| उरण । वार्ताहर ।
मंगळवारी अरबी समुद्राला मिळणार्या नाल्यातून आलेल्या काळ्या पाण्यामुळे उरणचा पिरवाडी किनारा काळवंडून गेला होता. त्यामुळे या किनार्यावर येणार्या पर्यटकांनाही याचा फटका बसला आहे.उरण, पनवेल तसेच नवी मुंबईतील आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक दिवसीय पर्यटन स्थळ म्हणून पिरवाडी किनारा प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे उरणमधील स्थानिक नागरीक व तरुण या किनार्यावर येतात. सुट्टीच्या दिवशी तर शेकडो पर्यटकांची गर्दी आनंद लुटण्यासाठी या किनार्यावर येते असते. त्यामुळे या किनार्यावर सध्या विविध प्रकारचे करमणुकीचे साहित्य ही उपलब्ध आहे. तर दुसरीकडे खवय्यांना या किनार्यावर आपली भूक भागविता येते. त्यासाठी खास करून गावठी पद्धतीचे व स्थानिक सी फूड ही उपलब्ध आहे. पिरवाडी किनार्यावरील वाढत्या पर्यटनामुळे येथील स्थानिकांनाही काही प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.
मागील अनेक वर्षांपासून पिरवाडी किनार्याची समुद्राच्या भरतीच्या लाटांमुळे मोठ्या प्रमाणात धूप होत होती. परिणामी किनार्यावरील शेकडो वर्षांची नारळी, फोफळीची झाडे उन्मळून पडली पडत होती. ही किनार्याची धूप थांबविण्यासाठी दगडी बंधारा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे धूप थांबली आहे. मात्र नाल्यावाटे येणारे दुषित पाणी, तेलजन्य पदार्थ यामुळे पिरवाडी किनारा काळवंडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांकडून ही नाराजी व्यक्त केली जात आहे.