| मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्राच्या मुलांनी ‘फ’ गटात सलग दुसर्या विजय मिळवीत 32व्या किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. झारखंड राज्य कबड्डी असो.च्या विद्यमाने बोकारो येथील एम जी एम हायर सेकंडरी शाळेच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राने आज त्रिपुराचा 49-16 असा सहज पराभूत करीत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. पहिल्या सत्रात 22-09 अशी भक्कम आघाडी घेणार्या महाराष्ट्राने दुसर्या सत्रात आणखी जोशपूर्ण खेळ करीत हा विजय सोपा केला. संदेश बिल्ले, श्रीधर कदम यांच्या चौफेर चढाया त्याला विजय तारे, ओम शिर्के यांची मिळालेली बचावाची भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा गेला. आता महाराष्ट्राची गटातील शेवटची लढत पंजाबशी होईल.
महाराष्ट्राच्या मुलींनी मात्र निराशा केली. काल उत्तराखंड बरोबर 40-46 अशी हार पत्करल्या नंतर देखील मुलींनी त्या पराभवातून काहीच बोध घेतला नाही. या सामन्यात महाराष्ट्राची एक खेळाडू जायबंदी देखील झाली. आज तोच धसका घेऊन खेळावयास उतरलेल्या मुलींनी मध्य प्रदेश बरोबरच्या सामन्यात देखील 38-42 असा 4 गुणांनी पराभव पत्करला. या सलग दुसर्या पराभवाने महाराष्ट्राच्या मुलींचे बाद फेरी गाठावयाचे स्वप्न भंग पावले.