नांदेड–पनवेल एक्सप्रेसमध्ये पिस्तूल सापडले

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल रेल्वेस्थानकात आलेल्या नांदेड–पनवेल एक्सप्रेसमधील जनरल डब्यातील वॉशबेसिनखालील कचरा कुंडीत एक गावठी कट्टा (पिस्तूल) आढळून आल्याने रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

नांदेड–पनवेल एक्सप्रेस ही गाडी पनवेल रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक 6 वर आली होती. त्यावेळी जनरल डब्यात अर्जुनकुमार वर्मा (33) हे सफाई कामगार साफसफाई करत असताना वॉशबेसिनखालील कचराकुंडीत त्यांना एक पिस्तूल दिसून आले. ही माहिती तत्काळ रेल्वे प्रशासन व पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पनवेल रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पिस्तूल ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात ते गावठी कट्टा असल्याचे समोर आले असून, ते कोणाचे आहे आणि ते डब्यात कसे आले याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version