अलिबाग विभागातील 32 सरकारी कार्यालये भाड्याच्याच घरात
वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च
। अलिबाग । वर्षा मेहता ।
कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, महत्त्वाचे दस्तावेज, शेकडो नागरिकांची ये-जा या कार्यालयांत असताना अलिबाग, पेण, मुरुड, सुधागड-पाली या चार शहरांतील 32 कार्यालये भाड्याच्या घरात थाटली आहेत. यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये भाड्यापोटी भरावे लागत आहे.त्यामुळे या सर्व कार्यालयांना हक्काची जागा कधी मिळणार याबाबत संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे.
एकीकडे हक्काच्या जागेत कार्यरत असणार्या कार्यालयांच्या नूतनीकरणावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे. तर भाड्याच्या घरात राहणार्या कार्यालयांकडे जिल्हा प्रशासनासह शासनानेही दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भाड्याच्या खोलीत राहणार्या शासकीय कार्यालयांसाठी जागा उपलब्ध देण्यास शासन अपयशी ठरत आल्याचे सिद्ध झाले आहे.
अलिबागमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यरित अलिबागसह पेण, मरुड, सुधागड-पाली या तालुक्यांचा समावेश आहे. या चारही तालुक्यांमध्ये विविध शासकीय कार्यालये आहेत. पण त्यांतील 32 कार्यालये अद्यापही भाड्याच्या जागेत कार्यरत आहेत. अनेकदा भाड्याने थाटलेल्या शासकीय कार्यालयांच्या जागा बदलत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्या जागेचा पत्ता शोधण्यात पायपीट करावी लागते. अनेकदा तर पत्ता शोधण्यातच दिवस निघून जातो.
जिल्ह्यातील महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यासारखी अनेक सार्वजनिक कार्यालये गृहनिर्माण सहकारी इमारतीत किंवा खासगी बंगल्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आली असल्यामुळे ते कार्यालय शोधणे जिकरीचे होते. केवळ प्रशासकीय उदासिनतेमुळे अनेक कार्यालयांना खितपत भाडेतत्वावरील इमारतीत कामकाज करावे लागत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग विभागाच्या अखत्यारित अलिबागसह पेण, मरुड, सुधागड-पाली मिळून 32 कार्यालय भाड्याच्या जागेवर आहेत. यामध्ये शासकीय अधिकार्यांना दिलेल्या जागेचाही समावेश आहे. या जागा भाडेतत्वावर असल्यामुळे दर महिन्याला प्रशासनाला भाडे द्यावे लागते. संबंधित खात्याच्या वरिष्ठ प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून शक्य तेवढ्या लवकर स्वतंत्र इमारती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही केली जात असल्याचे दिसून आलेले नाही.
सर्वसामान्यांची पायपीट थांबावी, याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी प्रशासकीय भवन उभारण्यात आले. मात्र त्यामध्ये अलिबागमधील 15 कार्यालयांना जागा न मिळाल्याने त्यांच्या नशिबी उपेक्षाच आली असल्याचे दिसून आले.
तालुकानिहाय भाडेतत्वावरील कार्यालयांची संख्या
अलिबाग- 15
मुरुड- 2
सुधागड-पाली- 6
पेण- 9
कृषी अधिकार्यांनाही मिळेना हक्काची जागा
सुधागड-पाली तालुक्यातील कृषी अधिकारी तसेच मंडळ कृषी अधिकारी यांना देखील शासनाची हक्काची जागा उपलब्ध झालेली नाही. या दोन्ही अधिकार्यांना पाली येथे भाड्याने जागा देण्यात आली आहे.
या सरकारी विभागांच्या नशिबीही उपेक्षाच
अलिबाग, पेण, मुरुड व सुधागड-पाली या चार तालुक्यातील एकात्मिक विभागाची 4 कार्यालये, दुय्यम निबंधकांची 3 कार्यालये व महिला व बालकल्याण विभागाच्या 2 कार्यालयांना आजही हक्काच्या जागेची प्रतीक्षा आहे.