| माथेरान | वार्ताहर |
ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा सुरू झाला आहे. मनुष्य प्राणी काहींना काही करून स्वतःच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत असतो; परंतु जंगलामध्ये राहणार्या वन्यप्राण्यांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागते व त्यामध्येच काही टपून बसलेल्या विघ्नघातकी लोकांकडून त्यांची शिकार केली जाते. त्यामुळेच या दिवसांमध्ये वन्य प्राण्यांसाठी जंगलात ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठ्यांची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.
मागील काही वर्षांमध्ये माथेरानमध्ये वन्य प्राण्यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने भेकर, शेकरू रानडुक्कर त्याचप्रमाणे बिबट्याही आढळून आला आहे. या व्यतिरिक्त अनेक पशुपक्षी या दिवसांमध्ये माथेरानमध्ये येत असतात; परंतु त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अगदी नगण्य आहे. माथेरानमध्ये अनेक जिवंत झरे आहे; परंतु त्यांची निगा न राखल्या गेल्यामुळे हे पानवठे मे महिन्यापर्यंत कोरडे पडत असतात त्यामुळेच या वन्य प्राण्यांना अनेक वेळा पाहण्यासाठी मानव वस्तीमध्ये प्रवेश करावा लागतो. त्यातच त्यांचा जीवही गेलेला आहे.
या काळामध्ये माथेरानमध्ये अनेक स्थलांतरित पक्षी व प्राणी येत असतात, हा त्यांचा प्रजननाचा काळ असल्याने जंगल परिसरामध्ये पक्ष्यांची किलबिल ऐकू येत असते. म्हणूनच अशा पक्ष्यांनाही पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी वन विभागाकडून पाणी आडवा पाणी जिरवा या अंतर्गत जंगलांमध्ये बंधारे बांधण्यात आले होते. त्यामध्ये पाणीसाठा उन्हाळ्यात आढळून येत असे. परंतु, आता हे सर्व जमीनदोस्त झाल्यामुळे नव्याने जंगलामध्ये पाणवठे निर्माण करण्याची गरज असून, वन विभागाने त्याकडे लक्ष द्यावे, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे.