| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अमेरिकेतील क्रीडा विश्व हादरवून टाकणारी धक्कादायक घटना नॉर्थ कॅरोलिनामध्ये घडली आहे. गुरुवारी (दि. 18) अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यात एक बिझनेस जेट टेक ऑफ दरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानात असलेल्या सर्व 7 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात नॅसकार कंपनीचे निवृत्त दिग्गज ड्रायव्हर ग्रेग बिफल, त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले यांचाही समावेश आहे. टेकऑफच्या वेळीच रन-वेवर विमानाला अचानक आग लागली. काही कळायच्या आतच आगीने विकराळ रूप धारण केल्याने बचावकार्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
गुरुवारी सकाळी दहा वाजून सहा मिनिटांनी सेस्ना सी 550 हे विमान फ्लोरिडाच्या दिशेने उड्डाणासाठी सज्ज झाले होते. टेकऑफनंतर काही मिनिटांतच तांत्रिक अडचण जाणवल्याने विमानाने पुन्हा विमानतळावर परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात विमान जमिनीवर आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच आगीच्या भडका उडाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ग्रेग बिफल हे त्यांच्या पत्नी क्रिस्टीना, त्यांचा पाच वर्षांचा मुलगा रायडर आणि त्यांची १४ वर्षांची मुलगी एम्मा यांच्यासह विमानात होते.







