। पनवेल । वार्ताहर
नेचर क्युअर आणि योगा ग्रुप, खारघरतर्फे ‘मेरी धरा, मेरी जिम्मेदारी’, या उपक्रमाअंतर्गत खारघर सेक्टर-27 परिसरात 300 कडुलिंब रोपांची लागवड करण्यात आली आहे.
खारघरमधील सेंट्रल पार्क लगत सिडकोद्वारे उभारल्या जाणार्या कार्पोरेट पार्कसाठी भूखंड राखीव आहे. तसेच सदर परिसर निसर्गरम्य असून, चार पदरी रस्ते आणि मोकळ्या पदपथावर खारघरवासीय सकाळी-संध्याकाळी या परिसरात कसरतीसाठी तसेच चालण्यासाठी येत असतात. प्राचीन काळापासून कडुलिंबाच्या झाडाचा उपयोग आयुर्वेदिक औषधीमध्ये केला जातो. कडुलिंबाला सर्व रोग निवारण वृक्ष असे देखील संबोधले जाते. कडुलिंब वृक्ष मानवी शरीर, त्वचा आणि केसांना खूप फायदेशीर असून, एक रक्तशोधक औषधी वनस्पती असल्यामुळे ‘नेचर क्यूअर आणि योगा ग्रुप’च्या पदाधिकारी बिंदूसरी जैस्वाल आणि त्यांच्या सहकार्यांनी 22 जून रोजी खारघर सेक्टर-27 परिसरातील मोकळे भूखंड, रस्ते दुभाजक आणि रस्त्यालगत 300 कडुलिंब रोपांची लागवड केली. दरम्यान, लागवड केलेली कडुलिंब झाडांची रोपे तीन ते चार फूट उंचीची आहेत. या कडुलिंब रोपांची पावसाळ्यात वाढ होणार आहे. लागवड केलेल्या कडुलिंब वृक्ष रोपांची देखभाल देखील करण्यात येणार आहे, असे बिंदूसरी जैस्वाल यांनी सांगितले.