महावितरणकडून एक हजार एक वृक्षांचे रोपण

उल्हासनगर दोन विभागाचा उपक्रम

| कल्याण | प्रतिनिधी |

महावितरणच्या उल्हासनगर दोन विभागाकडून ’वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमा’त उत्स्फुर्त सहभाग नोंदवण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत एक हजार एक वृक्षांचे रोपण करण्याची कामगिरी करण्यात आली. पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वन विभागाच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

वन विभागाकडून 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान ’वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रम’ हाती घेण्यात आला होता. वृक्षारोपणासाठी जागा आणि रोपट्यांची उपलब्धताही वनविभागाने करून दिली. त्यानुसार पंधरा दिवसात एक हजार रोपट्यांची लागवड करण्यात आली. तर स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणि मिश्रा यांच्या हस्ते शेवटच्या रोपट्याचे रोपण करून उपक्रमाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कल्याण मंडल एकचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, कार्यकारी अभियंता देबाशिष दत्ता, उल्हासनगर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत रोपण केलेल्या रोपट्यांचे वृक्षांमध्ये रुपांतर होईपर्यंत संगोपन करण्याचा निर्धार उल्हासनगर दोन विभागातील कर्मचारी, अधिकार्‍यांनी व्यक्त केला. वन अधिकारी व्ही. नातू यांचे मोलाचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.

यासोबतच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ’प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’च्या जनजागृतीसाठी अंबरनाथ पूर्वेतील रोटरी क्लब हॉलमध्ये मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला मुख्य अभियंता श्री. मिश्रा व आमदार श्री. बालाजी किणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात जवळपास 350 वीज ग्राहकांनी सहभागी होत योजनेची सविस्तर माहिती घेतली. तसेच प्रात्यक्षिकाद्वारे वीज बचतीबाबत उपस्थितांना या मेळाव्यात माहिती देण्यात आली.

Exit mobile version