| रेवदंडा | वार्ताहर |
कृषक कल्याणकारी संस्था, चौल यांच्या विद्यमाने चौल पाझर येथे वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. चौल कृषक कल्याणकारी संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वृक्षारोपण कार्यक्रमात चौल कृषक कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील, इतर पदाधिकारी व ग्रामस्थ विशेष परिश्रम घेतात. यावर्षी वृक्षारोपण कार्यक्रमात प्रामुख्याने स्थनिक, पर्यावरणपूरक व उपयुक्त अशा वृक्ष रोपटे, तसेच बीजरोपण करण्यात येते. यावेळी बीजरोपणामध्ये चिंच, आंबा, कंरज, शमी, आवळा, फणस, मोह यांची लागवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी स्थानिक वृक्षलागवडीचे महत्त्व सांगितले. प्रामुख्याने मोह या वृक्षाचे महत्त्व सांगताना या वृक्षापासून तेलबियांची निर्मिती होते व मोहाच्या बियांपासून मिळणाऱ्या तेलाचा खाद्य तेल म्हणून वापर केला जातो. तसेल तेल काढल्यानंतर मोहाच्या बियांचा उपयोग गुरांचे खाद्य म्हणून होतो. मोहाच्या बियांपासून साप, विंचू पळून जातात. या मोहाच्या तेलाचा उपयोग कंबरदुखीवर उपाय म्हणून उपयुक्त असतो. मोहाचे झाड आयुर्वेदात आरोग्यदायी उपयुक्त असे आहे, अशी माहिती दिली. संस्थेच्या वतीने बागमळा महालक्ष्मी मंदिर, दत्त मंदिर, वरंडे-देवघर शाळा परिसर, अलिबाग चिंतामणराव केळकर विद्यालय परिसर, पालव बायपास रोड आदी ठिकाणी वृक्षदिंडीचे आयोजन विद्यार्थीवर्गाच्या सहभागाने आयोजित करण्यात आले होते, असे सांगितले.
या वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पाटील, तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांचे आभार संस्थेचे खजिनदार प्रमोद पाटील यांनी व्यक्त केले.