। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीतर्फे तळा बाजारपेठेत प्लास्टिक पिशवी तपासणी करण्यात येत आहे. तळा नगरपंचायत हद्दीमध्ये प्लास्टिक पिशवी व प्लास्टिक च्या वस्तूंवर शासनाने बंदी घातलेली असून मागील काही दिवसांपासून तळा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशवी व प्लास्टिकचा वापर होत असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच शहरातील सुज्ञ नागरिक व पत्रकार यांच्याकडून वारंवार प्लास्टिक पिशवी बंद संदर्भात तक्रारी देखील नगरपंचायतीला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या कर्मचार्यांकडून बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांच्या दुकानांमधून प्लास्टिक पिशव्या तपासणी करण्यात आली. तसेच ज्या व्यापार्यांनी आपल्या दुकानात प्लास्टिक पिशव्यांचा माल साठवून ठेवलेला आहे अशा व्यापार्यांनी तो माल नगरपंचायत कार्यालयात जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.लवकरच नगरपंचायत पथकाकडून बाजारपेठेत तपासणी करण्यात येणार असून ज्या व्यवसायिकाकडे प्लास्टिक पिशवी अथवा प्लास्टिक वस्तू सापडल्यास प्रथमतः 5000रू. दंड करण्यात येणार आहे तसेच जर का पुन्हा त्याच व्यवसायिकाकडे प्लास्टिक पिशवी आढळली तर दुसरा दंड 10000 रु.एवढा आकारण्यात येणार असल्याचे नगरपंचायत कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.