पनवेल ग्रामीणमध्ये प्लास्टिकबंदी; ग्रामीण भागात प्लास्टिकचा सर्रास वापर

| पनवेल । वार्ताहर ।
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सिंगल यूज प्लास्टिकवर 1 जुलैपासून बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाची पनवेल महापालिका क्षेत्रातही अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीणमध्ये ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे अशा प्रकारच्या प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याने ही बंदी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.आरोग्य विभागाने धडक कारवाई केल्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांबरोबरच सिंगल यूज इतर प्लास्टिक मनपा क्षेत्रात आढळून येत नाही. मात्र, याउलट स्थिती ग्रामीण भागात असून, दुकानदार, भाजीवाले, खाद्यपदार्थ आणि फळविक्रेते त्याचबरोबर मटण आणि चिकन शॉपवरही सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. विचुंबे, सुकापूर, पाली-देवद, कोप्रोली, नेरे, वाकडी, मोर्बे, पळस्पे, शिरढोण, पोयंजे या गावांमध्ये शहरीकरणामुळे लोकवस्ती वाढल्यामुळे दुकानांची संख्याही अधिक आहे. बाजारपेठा विकसित झाल्याने या ठिकाणी सिंगल यूज प्लास्टिक वापर आजही सुरू आहे. ग्रामपंचायतींच्या अखत्यारित असलेल्या या परिसरामध्ये कारवाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. कडक निर्बंध लादण्यासाठी ग्रामपंचायतीचे हात तोकडे पडत असल्याने बंदी असतानाही सिंगल यूज प्लास्टिक वापरले जात आहे.

या वस्तूच्या वापरावर कायद्याने मनाई
सिंगल यूज प्लास्टिकपासून बनविलेल्या 19 वस्तूंवर 1 जुलैपासून सरकारने बंदी आणली आहे. त्यात प्लास्टिक स्टिक ईयर-बड, फुग्यांसाठी वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक कांड्या, झेंडे, कॅण्डी, आइस्क्रिम स्टिक, सजावटीसाठी वापरले जाणारे पॉलिस्टाइनिन, प्लास्टिक प्लेट, कप, ग्लास, चमचे, काटे चमचे, चाकू, ट्रे, स्टरर, 100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीव्हीसी बॅनर, मिठाईच्या बॉक्सवरील प्लास्टिक, इन्हिटेशन कार्ड्स, सिगारेट पॅक अशा वस्तूंच्या वापरावर बंदी केलेली आहे. तसेच बंदीचे उल्लंघन केल्यास कलम 15 अन्वये त्याला दंड किंवा जेल किंवा दोन्ही अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे.

पनवेलच्या ग्रामीण भागांमध्ये प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींना प्लास्टिक बंदीच्या संदर्भात दुकानदार व विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

– संजय बोये, गटविकास अधिकारी, पनवेल
Exit mobile version