ट्रकमधील प्लास्टिक दाना लंपास

। नागोठणे । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या नागोठण्यातील मिरा नगर परिसरातील नागोठणे सर्व्हिस सेंटर या इंडियन ऑईल कंपनीच्या पेट्रोल पंपावर उभा करण्यात आलेल्या ट्रकमधून लाखो रुपये किंमतीच्या प्लास्टिक दान्याच्या 127 बॅग चोरी होण्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांकडून लंपास करण्यात आलेल्या या मालाची किंमत 2 लाख 15 हजार, 900 रुपये आहे. चोरीची ही घटना मंगळवार दि. 28 जुन रोजी सायंकाळी 6.45 वा. ते बुधवार दि. 29 जुनच्या पहाटे 3.30 च्या दरम्यान घडली आहे.

रिलायन्स कंपनीतून भरून आलेल्या व चोरी झालेल्या या प्लास्टिक दान्याच्या मालाचे वर्णन एलडीपीई 1070 एल 17 ग्रेड असे असून व प्रत्येकी 25 किलोग्रॅम वजनाच्या या प्लास्टिक दान्याच्या बॅग आहेत. चोरट्यांनी ट्रक मधील 400 पैकी 127 बॅग त्यांनी आणलेल्या दुसर्‍या गाडीत टाकून चोरून नेल्या आहेत. दरम्यान नागोठणे परिसरात यापूर्वीही अशाप्रकारच्या प्लास्टिक दाना चोरीच्या घटना घडलेल्या असल्याने व अनेक प्रकरणांत त्या चोरीचा छडा लागला नसल्याने आता बर्‍याच कालावधी नंतर पुन्हा एकदा प्लास्टिक दाना चोरीची घटना घडल्याने ट्रक मालक व चालकांत घबराट पसरली आहे. याप्रकरणी नागोठण्यातील एक ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक राहुल दुबे व त्यांचे चालक यांच्या तक्रारीनुसार नागोठणे पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नागोठण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस करीत आहेत.

Exit mobile version