सरसगडावरील प्लास्टिक कचरा हद्दपार; देऊळवाडा येथील गोळे दाम्पत्याचा विधायक उपक्रम

। सुधागड -पाली । वार्ताहर ।
पालीतील सरसगड किल्ल्यावर विविध ठिकाणी पडलेल्या प्लास्टिक बॉटल व प्लास्टिक कचरा हटविण्यात आला आहे. येथील देऊळवाड्यातील प्रदीप व स्वाती गोळे या दाम्पत्याने नुकतेच सरसगड स्वच्छता मोहीम राबवून किल्ल्याचा बराचसा भाग प्लॅस्टिकमुक्त केला आहे.
प्रदीप व स्वाती गोळे दाम्पत्य तसेच येथील अभिजित वरंडे हा तरुण गडाच्या पायथ्याशी लावलेली झाडे जगविण्यासाठी नियमित या झाडांना पाणी देखील घालतात. गडावर नेहमी पर्यटक व दुर्गप्रेमी येत राहतात. यातील काहीजण आपल्याकडील पाण्याच्या बॉटल, वेफर्स व इतर खाद्य पदार्थांचे वेस्टन गडावर टाकून जातात. हा प्लास्टिक कचरा साठल्याने गडावरील परिसर अस्वच्छ होऊन गडाची शोभा जात होती. त्यामुळे गोळे दाम्पत्यांनी ही मोहीम राबवली. यावेळी प्लास्टिकच्या बाटल्या व खाऊची वेस्टने आणि इतर कचरा जमा करून त्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.


सरसगडावर येणार्‍या गड प्रेमींना विनंती आहे की गडावर जातांना किंवा येताना आपण सोबत घेऊन जाणार्‍या खाऊच्या रिकाम्या पिशव्या आणि पाणी बाटल्या गडावर टाकू नये. येथे लावलेल्या डस्टबिनमध्येच हा कचरा टाकावा.

प्रदीप गोळे, दुर्गप्रेमी

Exit mobile version