। रायगड । प्रतिनिधी । शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग वेश्वी हॉटेल मॅपल आयव्ही येथे रविवारी (दि.18) सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्पर्धेतील खेळाडूंचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. चित्रलेखा पाटील ऊर्फ चिऊताई यांनी जाहीर केल्याप्रमाणे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिल्या 100 क्रिकेटवीरांचे रजिस्ट्रेशन मोफत करण्यात आले. यावेळी अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट खेळणार्या खेळाडूंनी नोंदणी करण्यासाठी हॉटेल मॅपल आयव्ही येथे गर्दी केली होती. अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्यातील सर्व क्रिकेटपटूंसाठी आयएसपीएल लीग 2024 टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळणार आहे. ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी-10 टूर्नामेंट सीझन 2’ हि स्पर्धा मुंबई येथे पार पडणार आहे. यांचे संघ मालक हे प्रसिद्ध सिलेब्रेटी असून देशाच्या प्रत्येक राज्यातून या स्पर्धेत खेळाडू निवडले जाणार आहेत.
यावेळी आयएसपीएलचे निवड समिती प्रमुख अमरजित गाद्री मार्गदर्शन करताना म्हणाले की, सभागृहात उपस्थित असणार्या सर्व खेळाडूंचे आयएसपीएल परिवारात स्वागत आहे. या परिवारात अलिबाग, मुरुड आणि रोहा या तालुक्यांमधून सहभागी होणार्या पहिल्या 100 खेळाडूंची मोफत नोंदणी होत आहे ती केवळ शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. टेनिस क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील करीत आहेत. तसेच, चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नामुळे आयएसपीएलच्या दुसर्या पर्वातील नोंदणीला अलिबागमधून सुरुवात झाली आहे. हे आयएसपीएलसाठी फार महत्वाचे आहे, असे प्रतिपादन गध्री यांनी केले आहे.
क्रिकेट हा भारताच्या कानाकोपर्यात खेळाला जात आहे. या खेळामधील खेळाडू काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. आयएसपीएलच्या पहिल्या पर्वाने टेनिस क्रिकेट खेळणार्या खेळाडूंचा डंका देशातच नव्हे परदेशात देखील वाजला आहे. टेनिस क्रिकेट देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे स्वप्न पाहणार्या खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. अनेक ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावर लेदरबॉल क्रिकेट सामान्यांनाच प्राधान्य दिले जात होते. आता हे चित्र बदलले आहे. अनेक मैदान व्यवस्थापनाच्या समित्यांमधून टेनिस क्रिकेट आमच्या मैदानावर खेळवा, अशी मागणी होत आहे. आयएसपीएलमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन देण्यात येते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर खेळाडूंचा खेळ अधिक चांगला झालेला पहिला आहे. असे ही आयएसपीएलचे निवड समिती प्रमुख अमरजित गाध्री म्हणाले.