खेळाडूंच्या स्वप्नांना मिळाले बळ- चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या माध्यमातून

। रायगड । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख, यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग वेश्‍वी हॉटेल मॅपल आयव्ही येथे रविवारी (दि.18) सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत स्पर्धेतील खेळाडूंचे रजिस्ट्रेशन करण्यात आले. चित्रलेखा पाटील ऊर्फ चिऊताई यांनी जाहीर केल्याप्रमाणे स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिल्या 100 क्रिकेटवीरांचे रजिस्ट्रेशन मोफत करण्यात आले. यावेळी अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंनी नोंदणी करण्यासाठी हॉटेल मॅपल आयव्ही येथे गर्दी केली होती. अलिबाग-मुरुड-रोहा तालुक्यातील सर्व क्रिकेटपटूंसाठी आयएसपीएल लीग 2024 टेनिस क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख, युव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी मिळणार आहे. ‘इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टी-10 टूर्नामेंट सीझन 2’ हि स्पर्धा मुंबई येथे पार पडणार आहे. यांचे संघ मालक हे प्रसिद्ध सिलेब्रेटी असून देशाच्या प्रत्येक राज्यातून या स्पर्धेत खेळाडू निवडले जाणार आहेत.

1 / 19



यावेळी आयएसपीएलचे निवड समिती प्रमुख अमरजित गाद्री मार्गदर्शन करताना म्हणाले की, सभागृहात उपस्थित असणार्‍या सर्व खेळाडूंचे आयएसपीएल परिवारात स्वागत आहे. या परिवारात अलिबाग, मुरुड आणि रोहा या तालुक्यांमधून सहभागी होणार्‍या पहिल्या 100 खेळाडूंची मोफत नोंदणी होत आहे ती केवळ शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. टेनिस क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम यूव्ही स्पोर्ट्सच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील करीत आहेत. तसेच, चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नामुळे आयएसपीएलच्या दुसर्‍या पर्वातील नोंदणीला अलिबागमधून सुरुवात झाली आहे. हे आयएसपीएलसाठी फार महत्वाचे आहे, असे प्रतिपादन गध्री यांनी केले आहे.

क्रिकेट हा भारताच्या कानाकोपर्‍यात खेळाला जात आहे. या खेळामधील खेळाडू काही वर्षांपूर्वी प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. आयएसपीएलच्या पहिल्या पर्वाने टेनिस क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंचा डंका देशातच नव्हे परदेशात देखील वाजला आहे. टेनिस क्रिकेट देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचे स्वप्न पाहणार्‍या खेळाडूंसाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. अनेक ठिकाणी क्रिकेटच्या मैदानावर लेदरबॉल क्रिकेट सामान्यांनाच प्राधान्य दिले जात होते. आता हे चित्र बदलले आहे. अनेक मैदान व्यवस्थापनाच्या समित्यांमधून टेनिस क्रिकेट आमच्या मैदानावर खेळवा, अशी मागणी होत आहे. आयएसपीएलमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन देण्यात येते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतर खेळाडूंचा खेळ अधिक चांगला झालेला पहिला आहे. असे ही आयएसपीएलचे निवड समिती प्रमुख अमरजित गाध्री म्हणाले.

काही वर्षांपूर्वी सिझन क्रिकेटला अनन्य साधारण महत्व होते. लेदर बॉलच्या क्रिकेट बरोबरच आता टेनिस क्रिकेटकडे खेळाडू व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून खेळत आहेत. पीएनपी चषकाच्या माध्यमातून खर्‍या अर्थाने क्रिकेटमधील खेळाडूंना संधी मिळाली. आता चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून तसेच आयएसपीएलच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या विश्‍वात रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंनी इच्छाशक्ती आणि उद्दिष्ट बाळगून मिळलेल्या संधीचे सोने करावे.

प्रदीप नाईक, सचिव,
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन

अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्हा क्रिकेटच्या पंढरीला जोडला जात आहे. यापूर्वी जिल्ह्यात टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा पाहायला मिळाल्या होत्या; परंतु पीएनपी चषकाने टेनिस क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. यामुळे आता जिल्ह्यातील क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. पीएनपी चषकाने लहान थोरांना देखील क्रिकेट पाहण्याचे वेड लावले. आतातर व्यावसायिक दृष्टिकोन असणार्‍या आयएसपीएलच्या माध्यमातून क्रिकेट खेळण्याची संधी रायगडमधील खेळाडूंना मिळणार आहे. यामुळे 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी रायगड जिल्ह्यातील खास करून अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील खेळाडूंनी संधीचे सोने करून देशाकरिता खेळण्याची भावना मनात निर्माण करावी.

अ‍ॅड. मानसी म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख, शेकाप


1983 नंतर देशात सिझन क्रिकेटचे मोठे आकर्षण तयार झाले. टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा क्वचितच खेळल्या जात होत्या. आता उलट झाले आहे, टेनिस क्रिकेटला ग्लॅमर तयार झाले आहे. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम खेळाडू पुढे येत आहेत. अशा खेळाडूंच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष नेहमीच उभा राहत आला आहे. शेतकरी कामगार पक्षाने उदयोन्मुख खेळाडूंना नेहमीच व्यासपीठ देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी आयएसपीएलचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आता खेळाडूंनी क्रिकेटच्या विश्‍वात आपले भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. क्रिकेटर म्हणून आपली नोंदणी होत असलीतरी आता मेहनत करून तुमचे ध्येय गाठण्यासाठी सज्ज व्हा.

अ‍ॅड. गौतम पाटील

राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक बांधिलकी जपणार्‍यांमध्ये चित्रलेखा पाटील हे नाव अग्रस्थानी आहे. अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंना चिऊताईंनी आयएसपीएलची कवाडे उघडी केली आहेत. हि खेळाडूंसाठी सुवर्णसंधी आहे. आता खेळाडूंनी आपले ध्येय निश्‍चित करून ते गाठण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावा. टेनिस क्रिकेटमध्ये आता व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण झाला आहे. खेळाडूंना चांगले पैसे मिळण्याचे साधन निर्माण झाले आहे. यामुळे खेळाडूंनी टेनिस क्रिकेटमध्ये आपले स्थान निश्‍चित करून लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. अभ्यासाबरोबरच खेळाला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. यामुळे मोबाईलच्या विश्‍वात जगण्यापेक्षा मैदानावरील क्रीडा विश्‍वात मनसोक्त जगा.

योगेश पेणकर,
कर्णधार माझी मुंबई, आयएसपीएल
Exit mobile version