दुकानदाराकडून खराब मिठाई, समोसे विक्री
| महाड | प्रतिनिधी |
महाड शहरातील एस.जी. रोडवरील प्रसिद्ध असणाऱ्या सिद्धी स्वीट या दुकानातून 16 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने समोसे खरेदी केले. मात्र, ही व्यक्ती सामोसे घरी नेऊन खात असता सामोसे खराब लागल्याचे आढळून आले. मात्र, लक्षात येण्यापूर्वी घरातील काहींनी सामोसे खाल्ले होते. खरेदीदार यांच्या पत्नी व आई यांनी सामोसे खाल्ल्याने त्यांना पोटदुखीसह जुलाबाचा त्रास झाला. ही गंभीर बाब लक्षात येताच घरातील सदस्य जुनेद तांबोळी यांनी दुकानात धाव घेऊन दुकानदाराच्या ही बाब लक्षात आणून दिली. मात्र, दुकानदाराने ही बाब गांभीर्याने न घेता, चुकून झाले असेल, अशी उलटसुलट उत्तरे दिली. त्याचप्रमाणे उलटपक्षी खरेदीदार यांना धमकी देण्यासाठी सहकारी मित्रमंडळींद्वारे भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करत त्रास देण्याचा प्रकार सिद्धी स्वीट मालक व चालक यांच्याकडून करण्यात आला.
महाड शहरात येणारे बहुतांश गिऱ्हाईक हे ग्रामीण भागातून येत असतात. ग्रामीण भागातील काही नागरिक कमी शिकलेले, साधे भोळे असतात. हे सर्व दुकानदारांवर विश्वास ठेवून मिठाई, स्वीट्स, पाव यांसारखे खाद्यपदार्थ नेत असतात. बहुतांशी वेळा ग्रामीण भागातील जनतेला पदार्थाचे एक्सपायरी डेट म्हणजे काय हेच माहीत नसते. मात्र, ही भोळी जनता दुकानदारावर विश्वास ठेवून वस्तू खरेदी करत असतात. महाड शहर व तालुक्यातील महामार्गावरील स्वीट दुकाने मिठाईचे खाद्यपदार्थ कोठे बनवतात? तेथे स्वच्छता राखली जाते का? ही जागा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी योग्य आहे का? खाद्यपदार्थ बनवत असताना कोणत्या दर्जाचे पदार्थ वापरले जातात, या सर्व गोष्टींची तपासणी करणे अन्न आणि औषध प्रशासनाला क्रमप्राप्त बनले आहे. मागील वर्षी महाड येथील एका नामांकित स्वीट व्यावसायिकांनीदेखील खराब खाद्यपदार्थ विकल्याने या दुकानावर कारवाई झाली होती. मात्र, अन्न प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याने मिठाईसह फास्टफूड विक्रत्यांचे फावले आहे. अन्न प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.
