भूखंड फसवणूक प्रकरण: वकील पितापुत्रासह तिघांविरुद्ध गुन्हा

| उरण | प्रतिनिधी |

सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेंंतर्गत शेतकर्‍याला देण्यात आलेला 1400 चौ.मी. चा भूखंड 50 टक्के तत्वावर विकास करण्यासाठी दिलेला असताना शेतकर्‍याला अंधारात ठेवून परस्पर विक्री करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांविरुद्ध उरण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोकडवीरा गावातील शेतकरी चंद्रकांत पाटील (65) यांना सिडकोच्या साडेबारा टक्के योजनेंतर्गत 2008 साली 1400 चौ.मी. भूखंड देण्यात आला होता. तो भूखंड शेतकर्‍यांनी 50टक्के तत्वावर विकास करण्यासाठी करारपत्र तयार करून अ‍ॅड. हर्षल पाटील, अ‍ॅड. मेघनाथ पाटील या पिता पुत्रांकडे देण्यात आला होता. मात्र शेतकर्‍याला अंधारात ठेवून विकासकाने कोट्यवधी किंमतीचा भूखंड सी-वूड-नवीमुंबई येथील बिल्डर संजय म्हात्रे यांना विक्री करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या फसवणुकीची कुणकुण लागल्याने चंद्रकांत पाटील यांनी सिव्हिल मॅटर असल्याने उरण न्यायालयात दावा दाखल केला होता. सुनावणीनंतर उरण न्यायालयाने संबंधित तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

उरण न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात पनवेल येथील सेशन कोर्टात दाद मागितली होती. शेतकर्‍यांतर्फे अ‍ॅड. असीत चावरे आणि अ‍ॅड. तन्वीर पटेल यांनी युक्तिवाद करुन शेतकर्‍याची न्याय बाजू मांडली. सुनावणीनंतर पनवेल सत्र न्यायालयानेही उरण न्यायालयाचा निर्णय कायम करत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर आणि शेतकरी चंद्रकांत पाटील यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिस ठाण्यात 24 एप्रिल रोजी हर्षल पाटील आणि मेघनाथ पाटील या पिता-पुत्रांसह ग्रीन एंटरप्राईसचे मालक संजय म्हात्रे आदी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली.

Exit mobile version