व्यापारी संकुल विकण्याचा डाव उधळवला

बांधकाम समितीच्या बैठकीत टेंडर रद्द

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथे जिल्हा परिषद आणि नगररचना विभागाने निर्माण केलेल्या नेरळ व्यापारी संकुलाचे गाळे विकण्याचा डाव जिल्हा परिषद सदस्य बाबू घारे यांनी उधळवून लावला आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषदेने या संकुलातील 104 गाळे विकण्यासाठी टेंडर काढले होते. हे टेंडर रद्द करण्यात यावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या बैठकीत ठराव घेऊन ते टेंडर रद्द केले. दरम्यान, जिल्हा परिषद स्थानिकांना ते गाळे मिळावे यासाठी नव्याने प्रक्रिया राबविणार असून हा धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषद आगामी काळात घेणार आहे.

नेरळ गावातील टपरीधारकांसाठी रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ संकुल विकास प्राधिकरण यांनी व्यापारी संकुल बांधले होते. या संकुलाचे बांधकाम 2022 मध्ये तत्कालिक रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या अध्यक्षपदाच्या काळात पूर्ण झाले होते. कोविड नंतर जिल्हा परिषदेत सदस्य मंडळ नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून गाळ्यांचे वाटप केले जात नव्हते. नेरळ गावातील टपरीधारकांसाठी बांधलेले व्यापारी संकुल ऑक्टोबर 2025 मध्ये टेंडर काढून लाटण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी जिल्हा परिषदेने व्यापारी संकुलातील 104 गाळ्यांचे वाटप करण्यासाठी इ-निविदा काढली होती आणि या निविदा प्रक्रियेला कडाडून विरोध झाला. त्यावेळी, बाहेरच्या अनेक ठेकेदारांनी त्या 104 गाळ्यांचे हक्क मिळावेत यासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते व जिल्हा परिषद बांधकाम समितीचे सदस्य बाबू घारे यांनी, दि.12 मे रोजी अलिबाग येथे झालेल्या बांधकाम समितीच्या पहिल्याच बैठकीत नेरळ व्यापारी संकुलाचा विषय उपस्थित केला. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि बांधकाम समितीचे सभापती मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत, जिल्हा परिषद सदस्यांचा अधिकार असताना नेरळ व्यापारी संकुलाचे गाळे देण्याचे टेंडर काढलेच कसे? असा धोरणात्मक निर्णय जिल्हा परिषदमध्ये लोकनियुक्त सदस्य मंडळ नसताना कसा होऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर एकमताने नेरळ व्यापारी संकुल मधील 104 गाळे विकण्यासाठी काढलेले टेंडर रद्द करण्याचा ठराव एकमताने मंजूर झाला.

Exit mobile version