तरुण खेळाडूंच्या कर्तृत्वाचा सन्मान
। मुंबई । प्रतिनिधी ।
पीएनबी मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप (जेबीसी)च्या 8व्या पर्वाचा समारोप हैदराबाद येथील स्टेडियममध्ये अंतिम सामन्याने झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने देशातील तरुण बॅडमिंटन खेळाडूंच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यात आला. यावेळी जेबीसीने सलग तिसर्या वर्षी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अनेक शहरांमधील बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक मुलांचा सहभाग’ या प्रकारात हा जागतिक विक्रम नोंदवण्यात आला आहे.
यावेळी आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते आणि जेबीसीचे मार्गदर्शक चिराग शेट्टी आणि सात्विक रंकीरेड्डी, इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडियाचे सीईओ व्यंकट चंगवल्ली, पीएनबी मेटलाइफचे सीईओ आणि एमडी समीर बन्सल, पीएनबी मेटलाइफचे सीएमसीओ सौरभ लोहटिया यांनी सांगता समारंभाचे नेतृत्व केले. त्यांनी विजेत्या युवा खेळाडूंना प्रतिष्ठित जेबीसी ट्रॉफी प्रदान केली आणि त्यांच्या कामगिरीचा सन्मान केला. कार्यक्रमात चिराग आणि सात्विक यांनी विशेष मार्गदर्शन सत्र घेतले. या सत्रात त्यांनी तरुण बॅडमिंटन खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना खेळ सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला.
यावेळी सात्विकसाईराज रंकीरेड्डी म्हणाले की, या वर्षाच्या ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तरुण खेळाडूंची अपूर्व प्रतिभा आणि उत्साह पाहणे खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांची समर्पण भावना आणि खिलाडूवृत्ती तळागाळाच्या पातळीवर खेळाला चालना देण्याच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित करून देत आहे. तसेच, जेबीसी 2024 चे सहमार्गदर्शक चिराग शेट्टी म्हणाले की, पीएनबी मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या 8व्या पर्वामध्ये तरुण खेळाडूंनी दाखवलेली ऊर्जा आणि कौशल्य खरोखरच आश्चर्यकारक आहे. ही स्पर्धा उदयोन्मुख बॅडमिंटन स्टार खेळाडूंसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ झाली आहे. सलग तिसर्या वर्षी स्वतःचा जागतिक विक्रम मोडणे हे या स्पर्धेच्या वाढत्या प्रभावाचे द्योतक असल्याचेदेखील चिराग यांनी सांगितले.
पीएनबी मेटलाइफचे समीर बन्सल यांनी या स्पर्धेच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पीएनबी मेटलाइफ ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपचा आणखी एक यशस्वी पर्व संपल्यावर आम्ही सलग तिसर्या वर्षी मिळवलेल्या जागतिक विक्रमाचा आनंद साजरा करत आहोत. तसेच, देशभरातील उदयोन्मुख खेळाडूंचाही सन्मान करत आहोत. या चॅम्पियनशिपमधून युवा खेळाडूंना त्यांची कौशल्ये सिद्ध करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे किती महत्त्वाचे आहे, हे या विक्रमातून दिसून आले आहे. जेबीसी ही स्पर्धा उदयोन्मुख गुणवंतांना विकसित करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी त्यांना तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ म्हणून यापुढेही कार्यरत राहणार असल्याचे समीर बन्सल यांनी सांगितले आहे.