जिल्ह्यातील हजारो प्राण्यांचे लसीकरण
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
जागतिक रेबीज दिनानिमित्त पशुसंवर्धन विभागामार्फत रायगड जिल्ह्यामध्ये विशेष कार्य मोहीम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील पाळीव कुत्रे, मांजरी व घोडे आदी मिळून तब्बल 1343 प्राण्यांना रेबीज रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले. तसेच तज्ज्ञांनी रेबीजबद्दल शास्त्रशुद्ध माहिती देऊन जनजागृती केली.
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, रायगड डॉ. सचिन देशपांडे यांनी सांगितले की, रेबीजबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी आणि प्राण्यांना व मानवाला या प्राणघातक आजारापासून वाचवण्यासाठी दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने पशुसंवर्धन विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील पाळीव कुत्रे, मांजरी आणि घोडे यांना रेबीज रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आले असून, जिल्ह्यातील शाळांमध्ये रेबीज रोग जनजागृती केली आहे, अशी माहिती डॉ. सचिन देशपांडे यांनी दिली आहे.
जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, रायगडचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजय कांबळे यांनी सांगितले की, सर्वात जुन्या विषाणूजन्य रोगांपैकी एक रेबीज हा रोग लसीद्वारे रोखता येतो. हा झुनोटिक रोग मानवामध्ये एखाद्या रेबीज झालेल्या प्राण्याच्या चाव्याद्वारे किंवा ओरखड्यांद्वारे पसरतो आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेवर परिणाम करतो. क्लिनिकल लक्षणे दिसू लागल्यास रेबीज 100 टक्के प्राणघातक ठरू शकतो. डब्ल्यूएचओने 2030 पर्यंत कुत्रा-मध्यस्थ रेबीजमुळे होणारे मृत्यू संपवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. रेबीज रोग प्रतिबंधात्मक लस प्राणी आणि मानव यांच्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर प्राण्यामध्ये आणि मानवांमध्ये रेबीजचा धोका कमी करू शकतो, असे डॉ. अजय कांबळे यांनी सांगितले. 18 व्या जागतिक रेबीज दिन 2024 ची थीम, ब्रेकिंग रेबीज बाऊंडरीज ही आहे. ही थीम सरकार, आरोग्य संस्था, पशुवैद्यकीय सेवा आणि समुदायांना एकत्र आणून, क्रॉस-सेक्टरल आणि क्रॉस-बॉर्डर सहयोगाची गरज असल्याचे दर्शविते.
रेबीजचे दोन प्रकार
फ्युरियस रेबीज : याला एन्सेफॅलिटिक रेबीजदेखील म्हणतात. हे 80 टक्के मानवी प्रकरणांमध्ये आढळते आणि रुग्णांमध्ये हायड्रोफोबिया (पाण्याची भीती) दिसून येते.
अर्धांगवायूचा रेबीज : याला मुका रेबीजदेखील म्हणतात. ज्यामुळे प्रामुख्याने अर्धांगवायू होतो. वेडसर कुत्रा चावल्यास किंवा रेबीजच्या संभाव्य संपर्कात आल्यास, आपत्कालीन प्रतिसाद म्हणून खालील प्रथमोपचार किंवा पोस्ट-एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस सुरू केल्या जाऊ शकतात. या पायर्या मध्यवर्ती मज्जासंस्थेमध्ये विषाणूचा प्रवेश प्रतिबंधित करतात, त्यामुळे त्याची प्रगती होण्यास विलंब होतो.
प्रथमोपचाराच्या पायर्या
कमीत कमी 15 मिनिटे साबणाने, पाण्याने जखम मोठ्या प्रमाणात धुवा. रक्तस्त्राव झाल्यास, दबाव लागू करणे आवश्यक आहे. हे रक्त प्रवाह प्रतिबंधित केले पाहिजे. रेबीजच्या संसर्गानंतर शक्य तितक्या लवकर स्थानिक जखमेवर उपचार व लसीकरण करावे. प्राण्याची माहिती मिळायला हवी. पाळीव प्राणी असल्यास लसीकरण इतिहास मिळू शकतो. रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलवले पाहिजे.
चौकट 3
तालुकानिहाय लसीकरण
खालापूर - 165
पनवेल - 73
अलिबाग - 133
श्रीवर्धन - 206
पेन - 158
कर्जत - 307
माणगाव - 121
तळा - 64
महाड - 26
पोलादपूर - 37
उरण - 19
पाली - 13
रोहा - 12
मुरुड - 09
एकूण - 1349