रायगडचे पाच पंच उत्तीर्ण
। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित केलेल्या पंच परीक्षेचा अंतिम निकाल एमसीएकडून जाहिर करण्यात आला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकार क्षेत्रातील 21 जिल्ह्यातील पंचांनी परीक्षेसाठी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पाच पंच उत्तीर्ण झाले आहेत. यात वरुण म्हात्रे (उरण), विघ्नहर्ता मुंढे (पनवेल), सागर मुळे (पेण), रोहन पाटील (उरण), चंद्रकांत चौधरी (कर्जत) यांचा समावेश आहे. उरणच्या वरुण म्हात्रे यांनी प्रॅक्टिकल परिक्षेत महाराष्ट्रात 94% गुण प्राप्त करुन दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर, बाकी सर्व पंचांनी 80% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत.
महाराष्ट्रातील सर्व पंचांना एमसीएच्यावतीने ऑनलाईन व कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले होते. तसेच, रायगड जिल्ह्यातील पंचांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने विशेष मार्गदर्शन मिळावे यासाठी माजी रणजी खेळाडू व विद्यमान बीसीसीआय पंच हर्षद रावले, मुंबई क्रिकेट असोसीएशनसे पंच राजन कसबे व रायगड जिल्ह्यातील क्रिकेट तज्ञ प्रशिक्षक नयन कट्टा यांनी गेले तीन महिने अथक परिश्रम घेऊन ऑनलाइन व कार्यशाळाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले आहे. या पंच शिबिरासाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष यशवंत साबळे व डी.के भोईर यांनी हॉल उपलब्ध करून दिला होता. तसेच, सर्व पंचांना मार्गदर्शन मिळावे यासाठी आरडीसीए सदस्य व स्टेट पॅनल पंच अँड. पंकज पंडित, राजेश पाटील, प्रदीप खलाटे, शंकर दळवी, सुयोग चौधरी यांनी परिश्रम घेतले आहेत. सर्व उत्तीर्ण झालेल्या पंचांचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुध्द पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य, खेळाडू व क्रिकेटप्रेमींनी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.