चित्रलेखा फॉर एन्व्हायर्नमेंट उपक्रमांतर्गत वृक्षारोपण
| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या अलिबाग-वेश्वी येथील महाविद्यालयात मंगळवारी (दि.28) सायन्स फोरमचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी चित्रलेखा फॉर एन्व्हायर्नमेंट या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. तसेच, प्रा. केतकी पाटील यांच्या वेबिनारचे आणि घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या जतनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमकार पोटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा. केतकी पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा म्हात्रे आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पूजा म्हात्रे यांनी केले. त्यांनी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाचे महत्त्व विषद केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त भाषणे सादर केली. प्रा.डॉ. ओमकार पोटे यांनी अध्यक्षीय वक्तव्य करत विद्यार्थ्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे कौतुक केले. प्रा. केतकी पाटील यांनी ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत विज्ञानाचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनाची गरज, संशोधनाची दिशा आणि विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याबाबत मार्गदर्शन केले. दरम्यान, घोषवाक्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. स्पर्धेमध्ये स्नेहा पाटील हिने प्रथम, साहिल मोटे याने द्वितीय, तर रिद्धी पाटील हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, दिशाली नाईक आणि नयन गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रा.डॉ. ओमकार पोटे यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कैलाससिंग राजपूत यांनी केले, तर अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी व्यक्त केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सायन्स फोरमचे प्रमुख प्रा. करण वाडकर आणि सायन्स फोरमच्या सदस्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचा समारोप डॉ. सुशील पाटील यांनी आभार प्रदर्शनाने केला.






