। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2022-2023 कर्जत तालुक्यातील दिलकप इन्स्टिट्यूट ममदापूर येथे रायगड जिल्ह्यातील 14, 17, 19 या वयोगटातील मुलींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 17 वर्षे वयोगटातील अंतिम मुलींचा सामन्यात पीएनपी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कनिष्ठ महाविद्यालयाने पेण येथील रानपाखर आश्रम विद्यालय या संघाला 12 गुणांनी पराभूत करून प्रथम क्रमांक पटकावला आणि मुंबई विभागीय स्पर्धेसाठी आपले नाव निश्चित केले.
या स्पर्धेमध्ये दहा तालुक्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाने म्हणजेच अलिबाग तालुक्याने अव्वल स्थान पटकावले. आता रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व पीएनपी कॉलेज करणार आहे.
विजेत्या सर्व खेळाडूंचे संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्राचार्य संजय मिर्जी, कनिष्ठ विद्यालय विभाग प्रमुख प्रा. निशिकांत कोळसे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी क्रिडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.